केडीएमसी: आयुक्तांच्या बदलीच्या वृत्ताला शिवसेनेच्या आमदारांचा ‘दुजोरा’

केडीएमसी: आयुक्तांच्या बदलीच्या वृत्ताला शिवसेनेच्या आमदारांचा ‘दुजोरा’

कल्याण (प्रविण आंब्रे) : सुमारे दीड वर्षांपूर्वी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पदभार स्वीकारला होता. पालिकेची सार्वत्रिक निवडणुक पुढे ढकलली गेल्यामुळे आयुक्तांनाच प्रशासक म्हणून नेमण्यात आले. मात्र येथे त्यांचे मन रमत नसल्याने बदली करून घेण्यासाठी आयुक्त प्रयत्नशील असल्याची शहरात चर्चा होती. सोमवारी एका कार्यक्रमात शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी नेमका हाच मुद्दा धरून, आयुक्तांनी बदली मागितली तरीही आम्ही त्यांना सोडणार नसल्याचे सांगत सूर्यवंशी यांनी येथेच राहावे, असे अप्रत्यक्षरीत्या सूचित केले. परिणामी महापालिका आयुक्त बदलीसाठी प्रयत्नशील असल्याच्या वृत्ताला एक प्रकारे दुजोराच मिळाल्याची खमंग चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

गेल्या काही महिन्यापासून पालिकेच्या अधिकारीवर्गात आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांचा कार्यकाल संपण्यापूर्वीच त्यांच्या बदलीसंदर्भात तर्कवितर्क सुरू आहेत. येथे त्यांचे मन रमत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात देखील सुरू आहे. सोमवारी महापालिका व डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने मुथा कॉलेजजवळील उंबर्डे येथे वृक्ष लागवड व संगोपन मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी भिवंडीचे खासदार कपिल पाटील, कल्याण पश्चिम विधानसभेचे आमदार विश्वनाथ भोईर आदींसह पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

या छोटेखानी कार्यक्रमात पालिका आयुक्तांच्या विविध कामांची प्रशंसा करताना आमदार विश्वनाथ भोईर म्हणाले की, आयुक्त जरी बदली मागत असतील तरी त्यांना आम्ही सोडणार नाही. आमदारांच्या या सूचक विधानाने आयुक्त सूर्यवंशी हे बदली करून घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या वृत्ताला एकप्रकारे ‘दुजोरा’ मिळाल्याची खमंग चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.

राज्यातील काही सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांची फाईल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दालनात प्रलंबित आहे. त्या फाइलवर मुख्यमंत्र्यांची अद्याप सही झालेली नाही. त्या अधिकाऱ्यांच्या यादीत महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांचेही नाव असल्याचे समजते. त्यामुळेच आयुक्तांच्या बदली संदर्भात पालिका वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून तर्कवितर्क सुरु आहेत.