ब्रिटीशकालिन विहीर बुजविण्याच्या प्रकरणाची केडीएमसीने घेतली दखल

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी परिसरातील ब्रिटीशकालिन ‘जिवंत’ विहीर बेकायदेशीरपणे बुजविण्यात येत असल्याचा आरोप करीत संबंधिताविरोधात कारवाई करण्याची मागणी करीत एका नागरिकाकडून आमरण उपोषण पुकारण्यात आले होते. दरम्यान, कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून दोन दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आल्याने सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
गोविंदवाडी परिसरात सुमारे १०० वर्षे जुनी असलेली ब्रिटीशकालिन विहीर होती. मात्र एका इमारतीच्या बांधकामासाठी सदरची विहीर काही लोकांकडून बुजविण्यात येत होती. त्याचप्रमाणे त्यामुळे परिसरातील लोकांचा तेथून जाण्या-येण्याचा मार्ग देखील बंद होणार होता. यासंदर्भात इकराम जाफरी य नागरिकाने याप्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करणे व विहीर पुनश्च सुरु करणे अशा मागण्या करीत कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा चालविला होता. मात्र कारवाई करण्यात महापालिका प्रशासनाकडून चालढकल करण्यात येत असल्याचा आरोप करीत महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषण सुरु केले.
अखेरीस महापालिका प्रशासनाने जाफरी यांना याप्रकरणी दोन दिवसात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी शुक्रवारी आमरण उपोषण सोडले.