केडीएमसी राबविणार ‘कोविड योद्धया’ची संकल्पना 

केडीएमसी राबविणार ‘कोविड योद्धया’ची संकल्पना 

कल्याण (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव  लक्षात घेता महापालिका अनेकविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवित आहे. याचा एक भाग म्हणून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोविड-१९ या साथीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार प्रत्येक निवडणूक पार्षद प्रभागक्षेत्रामध्ये प्रभागनिहाय 'कोविड योध्दा' ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून त्या-त्या प्रभाग क्षेत्रातील स्वयंसेवी संघटना-संस्थांचे पदाधिकारी, इच्छुक स्वयंसेवक हे 'कोविड योद्धा' म्हणून काम पाहतील. कोविड योद्धा हे संबंधित प्रभागातील स्थानिक लोकप्रतिनिधी-नगरसेवक, संबंधित प्रभागातील स्वच्छता निरिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली काम करतील.      

सबंधित 'कोविड योद्धयां'नी त्यांच्या प्रभागातील नागरीकांना कोविड-१९ आजाराबाबत मार्गदर्शन करणे, त्यासाठी  घ्यावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना व त्यांचे महत्व नागरीकांना पटवून देणे, तसेच प्रभागातील विशेषतः कन्टेनमेंट झोनमधील नागरिकांना, गृहनिर्माण सोसायट्यांना जीवनावश्यक वस्तू होम डिलिवरीद्वारा मागविणेबाबत मदत करणे, त्यासाठी स्वयंसेवी संघटनांच्या स्वयंसेवकांच्या मदतीने आवश्यक यंत्रणा उभारणे, प्रभागातील किराणा दुकानदार, मेडिकल स्टोअर्स, भाजी विक्रेता यांचेशी समन्वय साधून त्यांना देखील घरपोच सेवा देणेबाबत प्रवृत्त करणे, प्रभागातील वयोवृद्ध व्यक्ती-जेष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती  यांची माहिती स्वयंसेवकामार्फत संकलित करणे,  त्यांच्याशी वेळोवेळी फोनद्वारे संपर्क साधून  आवश्यक ती मदत पुरविणे, प्रभागक्षेत्रामध्ये तापाचे रुग्ण असल्याची  माहिती  मिळाल्यावर महापालिकेच्या वैद्यकीय यंत्रणेला कळविणे, प्रभागातील ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या आजार असलेल्या व्यक्तींची, गरोदर महिलांबाबतची माहिती स्वयंसेवकांमार्फत संकलित करुन त्यांना आवश्यक ती मदत करणे. 

त्याचप्रमाणे प्रभागातील झोपडपट्टी भागाच्या सीमांवर व अंतर्गत स्वयंसेवी सदस्यांच्या मदतीने हँडवाश स्टेशनची  उभारणी करणे, प्रभागातील झोपडपट्टी परिसरात  सार्वजनिक शौचालयांची नियमीतपणे स्वच्छता व निर्जंतुकीकरण होत असल्याबाबतची खात्री करणे, त्याप्रमाणे नियोजन करणे. तीव्र श्वसनदाह तसेच इन्फ्लुएन्झा सारख्या आजाराची लक्षणे असलेल्या व्यक्तीबाबत माहिती प्राप्त करून घेऊन ती माहिती महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेस देणे, त्याचप्रमाणे गृहनिर्माण संकुलामध्ये अथवा प्रभागांमध्ये नागरिकांना अनावश्यक गर्दी न करू देणे व किराणा दुकान, भाजी विक्रेते यांच्या दुकानाभोवती गर्दी होणार नाही यासाठी उपाययोजना करणे अश्याप्रकारे विविध उपक्रम राबवून कोविड-१९च्या निर्मूलनासाठी महापालिकेस सहकार्य करावयाचे आहे. कोविड योध्याच्या मदतीमुळे सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत महापालिकेस मोलाचे सहकार्य मिळेल व कोरोना साथीच्या वाढत्या प्रादुर्भावास  अटकाव होण्यास मदत होईल, अशी यामागील संकल्पना असल्याचे सांगण्यात आले आहे.