केडीएमसी’ने कार्यारंभ आदेश न देताच सव्वातीन कोटींची नालेसफाई 

केडीएमसी’ने कार्यारंभ आदेश न देताच सव्वातीन कोटींची नालेसफाई 

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेतील मोठ्या नाल्यांच्या सफाईची सुमारे ३.२५ कोटी रुपयांची कामे मे–जून महिन्यात करून घेण्यात आली आहेत. मात्र नालेसफाईची कामे संपली असली तरी दोन महिने उलटूनही या कामांचे कार्यारंभ आदेश अद्याप देण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कार्यारंभ आदेश न काढताच कामे केली जात असल्याच्या चर्चेला या प्रकाराने पुष्टी मिळाली आहे. यामुळे महापालिका प्रशासनाचा अजब कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

महापालिका क्षेत्रात दहा प्रभागक्षेत्र असून त्यामध्ये एकूण १२२ प्रभाग येतात. पावसाळ्यापूर्वी महापालिका क्षेत्रातील मोठ्या व लहान नाल्यांची सफाई कंत्राटी पद्धतीने दरवर्षी करून घेण्यात येतात. कल्याण डोंबिवली महानगरात एकूण ९४ मोठे नाले असून त्यांची एकूण लांबी ९९ किलोमीटर आहे. यंदाही मोठ्या नाल्यांच्या सफाईची कामे प्रभाग क्षेत्रनिहाय वेगवेगळे कंत्राटदार नियुक्त करण्यात आले होते. त्यासाठी प्रशासनाची मंजुरी देखील घेण्यात आली. त्यानुसार मे महिन्याच्या अखेरी व जून महिन्यात कंत्राटदारांकडून सदर मोठ्या नाल्यांची सफाई करून घेण्यात आली असून सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांची ही कामे आहेत. त्याचप्रमाणे महापालिकेने प्रभागक्षेत्र स्तरावर लहान नाल्यांची सफाई केली गेली आहे.

पाहणी दौरे संपन्न...

दरवर्षीप्रमाणे यंदाही नालेसफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरे करण्यात आले. कल्याण पश्चिम विधासभेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी नालेसफाईच्या कामांची पाहणी केली. कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार गणपत गायकवाड यांनीही पूर्वेतील नालेसफाईच्या कामांची पाहणी करीत कामाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनीही पाहणीदौरा करीत नालेसफाईचा आढावा घेतला होता. त्यांच्या समवेत शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली, मलनि:सारण विभागाचा अधिकारीवर्ग उपस्थित होता.

मंजुरी, कार्यारंभ आदेश नाहीत...

दरम्यान, मलनि:सारण विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता अनंत मादगुंडी यांच्याकडून यासंदर्भात माहिती घेतली असता त्यांनी, मंजुरी घेऊन पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे करून घेण्यात आली आहेत. मात्र या कामांचे कार्यारंभ आदेश निघाले नसल्याची बाब स्पष्ट केली. तसेच जेथे प्रॉब्लेम असेल तेथे काम करून घेण्यात येत असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.

कमी दरात कामेच होणार नाहीत...

महापालिका वर्क ऑर्डरवर चालत नाही. वर्क ऑर्डरशिवाय महापालिकेत कामे केली जातात. नंतर कधीतरी वर्क ऑर्डर दिली जाते. त्यातही प्रस्तावित मूळ रक्कमेपेक्षा २२ टक्के, २७ टक्के कमी दराने कामे केली जात आहेत. त्यामध्ये प्रत्यक्षात कामेच होणार नाहीत. ते परवडणारेच नाही. ज्या कंत्राटदारांनी कामे घेतली त्यांनी कामे पूर्ण केलेली नाहीत, आजही कामे अपूर्ण आहेत. म्हणून शहरात पाणी भरते, जे पाणी वाहून जात नाही ते साचते- ते सांडपाणी आहे, असा आरोप शहरातील जागरूक नागरिक तथा जागरूक नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास घाणेकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना केला आहे.