केडीएमसीचे २०२०-२१ वर्षाचे शिलकी अंदाज स्थायी समितीला सादर

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण डोंबिवली महापालिकेचा सन २०१९ - २० वर्षाचे १४३४ कोटी ६२ लाख जमा व १२१३ कोटी ५१ लाख खर्चाचे सुधारित अंदाज तर सन २०२०-२१ वर्षाचे १९९७ कोटी ७९ लाख जमा व १९९६ कोटी ७९ लाख खर्चाचे व १ कोटी ५१ हजार शिल्लकेचे मूळ अंदाज शुक्रवारी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी स्थायी समितीच्या सभेत सभापती विकास म्हात्रे यांच्याकडे सादर केले. हे अंदाज स्वच्छ व सुंदर शहर, आर्थिक शिस्तीचे पालन व सुप्रशासन या बाबींवर भर देणारा असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
महापालिकेची आर्थिक स्थिती बेताची असल्याने महापालिकेच्या कारभाराला आर्थिक शिस्त लावण्याचा मनोदय आयुक्त सूर्यवंशी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. तसेच महापालिकेच्या उपलब्ध असलेल्या उत्पन्नाच्या स्रोतातून जास्तीत जास्त वसुली करणे, जुन्या व वादातीत प्रकरणांमध्ये वेळेवर निर्णय घेऊन ती निकाली काढणे, महापालिकेच्या मालमत्तांचा १०० टक्के विनियोग करणे, पार्किंग व जाहिरातींमधून उत्पन्नात वाढ करण्यासाठी टास्क फोर्सची निर्मिती करणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी सांगितले.
आगामी वर्षासाठी २०२०-२१, १०५५ कोटी ११ लाख महसुली उत्पन्नाचे उद्दीष्ट ठेवले असुन मालमत्ता कर ३८४ कोटी २९ लाख, वस्तु व सेवा उपकर ३०५ कोटी ३९ लाख, पाणीपट्टी ७५ कोटी ३०लाख, विशेष अधिनियमाखाली वसुली १५० कोटी, मालमत्ता उपयोगिता, परवाने सेवा शुल्क ८७८ कोटी २४ लाख, शासन अनुदान २४ कोटी ५१ लाख, तर संकीर्ण ३३ कोटी ३८ लाखांचा महसुली उत्पन्नाचा अंदाज व्यक्त केला आहे.
महसुली खर्च पाहता आस्थापना खर्च ३९८ कोटी १६ लाख सार्वजनिक स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन ७८ कोटी ३८ लाख, देखभाल दुरुस्ती, सार्वजनिक बांधकाम १२४ कोटी ८७ लाख, पाणी खरेदी देखभाल दुरुस्ती २८ कोटी ३२ लाख, शहरी गरीब महिला बालकल्याण, क्रिडा, सांस्कृतिक ८२ कोटी २६ लाख, कर्ज परतफेड, घसारा निधी, परिवहन निधी १२१ कोटी १ लाख प्रशासकीय व संकिर्ण खर्च २७ कोटी २६ लाख, खर्चासह विकासासाठी स्वनिधी म्हणून ९० कोटीच्या तरतुदींचा अंतर्भाव करून १०५१ कोटी ५२ लाखांचा खर्चाचा अंतर्भाव आहे.
निधीचा योग्य पध्दतीने विनियोग करणे, जुने व प्रलंबित प्रकल्प व कामे पुर्ण करण्यास अग्रक्रम देणे, बांधील खर्चामध्ये काटकसर करणे, सर्व नागरी सुविधा आँनलाईन् करणे, किरकोळ स्वरूपाच्या विकास कामांना कात्री लावणे, कर्मचाऱ्यांसाठी कर्मवीर पुरस्कार देणे, अशा स्वरुपाच्या तरतुदीचा समावेश अंदाज पत्रकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे कामाची निकड व प्राधान्य क्रम ठरवुन कामे हाती घेण्यात येणार असुन अर्थ संकल्पात निधी आहे म्हणुन नवीन कामे घेतली जाणार नाहीत, असेही आयुक्तांनी यावेळी सूचित केले आहे.
दरम्यान, परिवहन समितीचे (केडीएमटी) सभापती मनोज चौधरी यांनी परिवहन समितीचे सन २०१९०-२० चे सुधारित ६९ कोटी ०५ लाख ५५ हजार रुपये जमेचे व ६६ कोटी ८१ लाख ५५ हजार रुपये खर्चाचे तर २ कोटी २४ लाख रुपये शिलकीचे अंदाज तसेच सन २०२०-२१ चे ९८ कोटी ७४ लाख ८६ हजार रुपये जमेचे व ९६ कोटी ६४ लाख ८६ हजार रुपये खर्चाचे तर २ कोटी १० लाख रुपये शिलकीचे अंदाज स्थायी समितीच्या सभेत सभापती विकास म्हात्रे यांना सादर केले.
काळा तलाव एक पर्यटन स्थळ
काळा तलाव येथे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी तेथे बगीचे, घड्याळ टोवर, सेल्फी पॉइंट, बोटिंग प्लेटफार्म, स्मार्ट वॉटर एटीएम, स्मार्ट टोयलेट, एम्फी थियेटर, पार्किंग सुविधा, मेडीटेशन आणि योग लॉन अशा सुविधा दोन टप्प्यात निर्माण करण्यात येणार आहेत.
अर्थसंकल्पातील वैशिष्ट्ये
# नवीन इमारतींना अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक (०.३) देण्याचे प्रस्तावित असून शासनाने त्यास मंजुरी दिल्यास महापालिकेला दरवर्षी किमान १०० कोटी इतका वाढीव महसूल मिळू शकतो.
# कल्याण डोंबिवलीत क्लस्टर योजना राबविण्यासाठी शासन मंजुरी मिळण्यासाठी देखील प्रयत्न सुरु आहेत.त्याद्वारे शहरातील लहान भूखंडावरील जुन्या धोकादायक, जीर्ण इमारतींचा पुनर्विकास या योजनेतून करणे शक्य आहे. याच्या विकास अधिभारातून महापालिकेला महसूल प्राप्त होणार आहे.
# स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी महापालिकेच्या हिश्श्यातून ५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
# पाणी गळती, अनधिकृत जोडण्या तसेच थकबाकी वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
# रस्त्यावरील वाहनांसाठी पार्किंग धोरण आखण्यात येणार आहे.
# दि. १५ मे पर्यंत आधारवाडी येथील क्षेपणभूमी बंद करण्यात येणार.
# महापालिकेची परिवहन सेवा (केडीएमटी) कार्यक्षम पद्धतीने चालाविण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार
आहे.
# महापालिका क्षेत्रातील दिव्यांग, डायलिसीस, एचआयव्हीग्रस्त,
# कर्करोग रुग्ण तसेच गरोदर महिलांना प्रवास भाड्यात १०० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
# प्रत्येक ब=प्रभागात आपला दवाखाना केंद्र सुरु करण्यात येणार.
# परिवहन विभागामार्फत जड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यात येणार.
# महापालिका क्षेत्रातील सुमारे १७ किमीचे सहा रस्त्यांचे सौंदर्यीकरण करून ‘स्वच्छ, सुंदर रस्ते व मोकळे रस्ते’ साकारण्यात येणार आहेत.
# शहराच्या विविध भागात प्रदूषण मोजणारी यंत्रे बसविण्यात येणार आहेत.
# दोन नवीन अग्निशमन केंद्रे उभारण्यासाठी १० कोटीची तरतूद करण्यात आली आहे.