केडीएमसीचा बल्याणी रस्त्यावर ‘इलाजापेक्षा उपाय भयंकर’

केडीएमसीचा बल्याणी रस्त्यावर ‘इलाजापेक्षा उपाय भयंकर’

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेतील बल्याणी रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे रस्त्यात खड्डा की खड्डयात रस्ता, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे खड्डयांमुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असतानाच येथील खड्डयांमध्ये प्रथम माती-खडी, व त्यानंतर केवळ जाड खडी टाकून ‘उपाययोजना’ करण्याचा प्रयत्न महापालिकेने केला आहे. मात्र, माती व खडींवर वाहने चालवताना चालकांना मोठीच कसरत करावी लागत असून दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता असल्याने महापालिकेच्या ‘इलाजापेक्षा उपाय भयंकर’ अशी  परिस्थिती आहे. रात्रीच्या वेळेस या रस्त्यावरून वाहन चालवणे म्हणजे अपघाताला आमंत्रण असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

आंबिवली ते टिटवाळा रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातही बल्याणी प्रभागातील या रस्त्याची फारच दुरवस्था झाली आहे. येथे तर रस्त्यात खड्डे आहेत की, खड्डयात रस्ता हेच कळत नाही. टिटवाळाकडून माताजी मंदिराच्या पुढे, बल्याणीकडे जाणाऱ्या वळणावर, आस्था इमारती जवळ, मशिदीलगत व त्यापुढे फेमस फर्निचर जवळ तर या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. आंबिवली नजीक नायलॉन प्लांट येथेही रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यातून वाहने हाकणे म्हणजे चालकांना मोठी कसरतच करावी लागत आहे. त्याचे वृत्तही प्रसारमाध्यमात आले होते. मे महिन्यात या रस्त्यावर थोडेफार खड्डे होते, ते पावसाळ्यापूर्वीच शास्त्रीय पद्धतीने भरण्याकडे पालिकेने अक्षम्य दुर्लक्ष्य केल्याचा नागरिकांचा आरोप आहे. 

पावसाळा सूरु झाल्यानंतर हे खड्डे वाढत गेले व रस्त्यांची पार दुरवस्था झाली. काही दिवसांपूर्वी एकदा माती आणि जाड खाडी टाकून सर्वः खड्डे न भरता काही ठिकाणी खड्डे भरण्यात आले, मात्र पावसात या खड्डे भरण्याची पुरती वाट लागून पूर्ववत खड्डे पडले. त्यानंतर ५-६ दिवसांपूर्वी पुन्हा एकदा जाड खडी टाकून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला गेला. यावेळी अनेक ठिकाणी खाडी सोबत माती टाकण्यात आली नाही त्यांमुळे या खडीवरून वाहने चालवताना चालकांना कसरत करावी लागत आहे. त्यातही दुचाकी वाहने या खडीवरून चालवताना घसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. परिणामी खड्ड्यांपेक्षा महापालिकेचा खडी भरणीचा उपाय भयंकर असल्याची प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करीत आहेत.

पाईप लाईनसाठी रस्त्यांचे खोदकाम

दुसरी बाब म्हणजे या रस्तावर अनेक ठिकाणी रस्ते खोदुन पाण्याच्या पाईप लाईन टाकल्या गेल्या आहेत. त्यामुळेही या रस्त्याची परिस्थती खस्ताहाल होत आहे. हे खड्डे खोदताना महापालिकेची परवानगी घेण्यात आली होती की नाही, याची चौकशी करण्याची गरज जागरूक नागरिक व्यक्त करीत आहे. विनापरवानगी रस्ते खोदणाऱ्यांवर कायदेशी कारवाई करण्याची गरज आहे. मांडा येथे नांदप रस्त्यावर, रेल्वे फाटक ते माताजी मंदिर रस्ता खोदुन पाण्याच्या पाईप लाईन टाकण्याचे प्रकार घडले आहेत. त्यासाठीही परवानगी घेण्यात आली नसावी, असा संशय जागरूक नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. 

सदरच्या पाईप लाईन टाकणाऱ्या प्लंबरची देखील चौकशी केल्यास मनमानीपणे नळ जोडणी करणाऱ्यांना चाप बसू शकेल. त्याचप्रमाणे रस्त्यावर मंडप टाकले गेल्यास त्यांची पाहणी करण्याची जबाबदारी निश्चित करण्यात यावी जेणेकरून मंडप टाकण्यासाठी खड्डे खोदण्याच्या प्रकाराला आळा बसेल, असे मत जागरूक नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

अपघातांना निमंत्रण देणारी खडी

रस्त्यांच्या आजूबाजूला अनेक बांधकामे अधिकृत, अनधिकृतपणे सुरु असून त्यासाठी आणली जाणारी खडी, रेती रस्त्यावर रस्त्याच्या बाजूला उतरवली जातात. त्याचा काही भाग रस्त्यावर पसरला जातो व तसाच राहतो. त्याची वाहतूक करणाऱ्या वाहनातून देखील अशी खडी रस्ताभर पडलेली अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. अशी रस्त्यावर पडलेली खडी भरधाव जाणाऱ्या वाहनांच्या अपघाताला कारणीभूत ठरू शकतात अशी भीतीही नागरिक व्यक्त करीत आहेत.