केडीएमसीच्या सात प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

केडीएमसीच्या सात प्रभागक्षेत्र अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महापालिकेचे (केडीएमसी) 'क' प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला लाच घेताना पकडल्यानंतर महापालिकेचे प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांनी तडकाफडकी सात प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या केल्या आहेत. 

महापालिकेच्या 'क' प्रभागाचे प्रभाग क्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे यांना एका सहकाऱ्यासह दोन दिवसापूर्वी बांधकामाच्या प्रकरणात कारवाई न करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले होते. या प्रकरणामुळे महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या ‘खाऊ’ प्रवृत्तीची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे प्रशासनाने तडकाफडकी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्या करीत कठोर पवित्रा घेतला. यानुसार महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेले तरुण अधिकारी अक्षय गुडधे यांची ‘क’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात बदली करण्यात आली आहे.

महापालिकेच्या ‘ड’ प्रभाग क्षेत्र अधिकारी वसंत भोंगाडे यांची ‘जे’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात, ‘जे’ प्रभाग क्षेत्र अधिकारी भरत पाटील यांची ‘फ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात बदली करण्यात आली आहे. ‘अ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांची ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात, ‘फ’ चे प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांची ‘अ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात, ‘ब’ चे प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते यांची ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात, ‘ह’ चे प्रभाग क्षेत्र अधिकारी भारत पवार यांची ‘इ’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात, तर ‘इ’ चे प्रभाग क्षेत्र अधिकारी अक्षय गुडधे यांची ‘क’ प्रभाग क्षेत्र कार्यालयात बदली करण्यात आली आहे.