पर्यावरण संवर्धनासाठी केडीएमसी’चा सोशल फंडा

पर्यावरण संवर्धनासाठी केडीएमसी’चा सोशल फंडा

कल्याण (प्रतिनिधी) : पर्यावरण दिनाचे निमित्त साधत पर्यावरणाच्या संवर्धनासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने किमान १ झाड लावा आणि महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवर झळकण्याचा बहुमान मिळवा, असे आवाहन नागरिकांना केले आहे. महापालिकेच्या या सोशल फंड्यामुळे महापालिका क्षेत्रात वृक्ष लागवडीला प्रोत्साहन मिळेल असा, विश्वास प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. 

वृक्ष लागवडीमुळे आजूबाजूचा परिसर सदाहरित होतो आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बहुमोल मदत होते. त्यामुळेच यावर्षीच्या पर्यावरण दिनानिमित्त महापालिका एक अनोखी संकल्पना राबवित असून दि. ५ जून रोजी "पर्यावरण दिनी" महानगरपालिका क्षेत्रात किमान १ झाड लावून त्यासमवेत स्वत:चा सेल्फी फोटो kdmcsocialmedia2020@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठविल्यास सदर फोटो महापालिकेच्या सोशल मिडीया पेजवर प्रसिध्द केला जाणार आहे. 

महापालिका क्षेत्रातील कोरोना साथीचा प्रादुर्भाव पाहता, सध्याच्या काळात ऑक्सिजनचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेता जास्तीत जास्त वृक्षांची लागवड करणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी नागरिकांच्या सहयोगाची देखील अत्यंत आवश्यकता आहे. तरी यावर्षीच्या पर्यावरण दिनी म्हणजेच ५ जून रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे नवीन संकल्पना घेऊन येत आहोत, झाडे लावा आणि आपला सेल्फी पाठवा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.