केडीएमसीची कुष्‍ठरोग वसाहत येथील महिलांना महिला दिनानिमित्‍त अनोखी भेट

केडीएमसीची कुष्‍ठरोग वसाहत येथील महिलांना महिला दिनानिमित्‍त अनोखी भेट

कल्याण (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्‍त कल्याण पूर्व येथील कुष्ठरोग वसाहतीतील महिलांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि बॅंक ऑफ बडोदा यांच्‍या संयुक्‍त विदयमाने शिलाई मशीनचे वाटप करुन सोमवारी एक अनोखी भेट देण्यात आली.

कुष्ठरोग वसाहतीमध्ये सामाजिक कार्य करणारे गजानन माने यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना कुष्ठरोग वसाहतीतील प्रशिक्षित महिलांची यापूर्वी माहिती दिली होती. सदर माहिती समजल्यानंतर महिलांना मदत करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. त्यानुसार कल्याणमधील बँक ऑफ बडोदाच्या

सहयोगाने महिला दिनी या वसाहतीमधील प्रशिक्षित महिलांना शिलाई मशिनचे वाटप करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे तेथील १८ प्रशिक्षित महिलांना शिलाई मशिन मिळाल्याने सबंधित महिलांच्या चेह-यावरील आनंद द्विगुणित झाल्याचे दिसून आले. शिलाई मशिन दिल्यामुळे ख-या अर्थाने कुष्ठरोग वसाहतीतील महिलांचा महिला दिन साजरा झाल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली.

या कार्यक्रमसमयी बँक ऑफ बडोदाचे कल्याणमधील व्यवस्थापक के. शनमुघेवेलन, महापालिका उपायुक्त अनंत कदम, परिवहन सभापती मनोज चौधरी, माजी स्थानिक नगरसेविका रेखा राजन चौधरी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, महिला व बाल कल्याण विभागाच्या स्वाती गरुड तसेच कुष्ठरोग वसाहतीतील अनेक महिला व नागरिक उपस्थित होते.