कोविडला आळा घालण्यासाठी केडीएमसीच्या विविध उपाययोजना

कोविडला आळा घालण्यासाठी केडीएमसीच्या विविध उपाययोजना

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-१९च्या रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी खासदार-आमदारांच्या उपस्थितीत महापालिका प्रशासनाची सोमवारी बैठक पार पडली. या बैठकीत कोविड-१९बाबत करावयाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीला कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, डोंबिवली विधानसभेचे आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, पोलिस उपायुक्त विवेक पानसरे, शिवसेनेचे डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश मोरे, दिपेश म्हात्रे, इंडियन मेडिकल असोसिएशनचे कल्याणचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, महापालिका वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील, डॉ. समिर सरवणकर आदी उपस्थित होते. सदर बैठकीत वाढत्या रुग्ण संख्येसंदर्भात चर्चा करण्यात आली. महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण त्वरेने होणे आवश्यक असून त्याकरीता केंद्राकडून महाराष्ट्र शासनास होणा-या लसीच्या पुरवठयात वाढ होणे गरजेचे आहे, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या बैठकीत व्यक्त केले. 

महापालिकेत काँटेक्ट ट्रेसिंग वाढविणे गरजेचे असल्याबाबत मत खासदार शिंदे व आमदार चव्हाण यांनी व्यक्त केले असता सध्या नागरी आरोग्य केंद्राच्या कर्मचा-यांमार्फत काँटेक्ट ट्रेसिंग केले जाते, ७०० जणांची काँटेक्ट ट्रेसिंगसाठी नेमणूक केली जाईल, सर्व्हेसाठी आउटसोर्सिंग करुन स्पेशल टिम तयार केली जाईल तसेच पालिका सदस्यांच्या सहभागाने कोरोना दक्षता समिती कार्यान्वित केली जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.

महापालिकेत प्रतीदिन २०००-२२०० इतके लसीकरण होत असून सध्या ६ शासकीय ठिकाणी व ९ खाजगी रुग्णालयात लसीकरण केले जात असल्याची माहिती वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी यावेळी दिली. पॉझिटीव्ह रुग्ण न सांगता घराबाहेर फिरतात, तसेच ज्येष्ठ नागरिक कोमॉर्बिड असल्याचे सांगत नसल्यामुळे रुग्णसंख्या वाढीस हातभार लागत असल्याची माहिती साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रतिभा पानपाटील यांनी दिली. त्यावर याकामी लोकप्रतिनिधींचे सहकार्य घ्‍यावे अशी सुचना आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली. त्यावर नगरसेवकांचा व्हाटस्अॅप ग्रुप करुन तो नागरी आरोग्य केंद्राशी जोडून ठेवावा, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिल्या. त्याचप्रमाणे ज्या इमारतीत रुग्ण सापडतील तेथे पोलिसांमार्फत एका व्हिजीटची व्यवस्था करावी अशी सूचना पालिका आयुक्तांनी पोलिस उपायुक्तांना केली. तसेच खाजगी वैदयकीय व्यावसायिकांना कोविड साथीसाठी महापालिकेस जास्तीत जास्त सहयोग देणेबाबत पत्र आरोग्य विभागामार्फत दिले जाईल, अशी माहिती पालिका आयुक्त सूर्यंवंशी यांनी दिली.