अडीच ऐवजी अकरा वर्षात पूर्ण झाला केडीएमसीचा ‘हा’ रेल्वे उड्डाणपूल!

अडीच ऐवजी अकरा वर्षात पूर्ण झाला केडीएमसीचा ‘हा’ रेल्वे उड्डाणपूल!

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली महापालिकेत असलेल्या टिटवाळा-आंबिवली परिसर कल्याण शहराला थेट जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेल्या वडवली येथील रेल्वे उड्डाणपुलाचे (ROB) काम जवळपास पूर्ण झाले आहे. लवकरच हा पूल जनतेसाठी खुला होणार आहे. सुमारे ११ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या या पुलाचे काम अडीच वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र महापालिका प्रशासनातील उदासीन वृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळे हा पूल पूर्ण होण्यास तब्बल १३ वर्ष उलटली आहेत. टिटवाळा-आंबिवलीकरांच्या सहनशीलतेची परीक्षा पाहणारा हा उड्डाणपूल त्यामुळेच हा पूल महापालिकेच्या दफ्तरी ऐतिहासिक उड्डाणपूल म्हणून नोंदला जाणार आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रेल्वे फाटक बंद करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाकडून काही वर्षांपूर्वीच देण्यात आले होते. त्यानंतर ठाकुर्ली रेल्वे फाटक बंद करण्यात आले, मात्र अद्याप वडवली फाटकातून वाहतूक सुरूच आहे. या फाटकात होणारे अपघात टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून मार्च, २०१० मध्ये वडवली येथे उड्डाणपूल बांधण्याचे काम करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली. दुपदरी ७२० मीटर लांबीच्या या पुलाच्या उभारणीत आलेल्या अडथळ्यांची शर्यत पार करताना प्रशासनाच्या नाकी नऊ आले होते. परिणामी अनेकदा काम थांबले होते तर काही वेळा ‘गोगलगायी’च्या गतीने काम केले जात होते. 

मागील ११ वर्षांच्या कालावधीत अनेक महापालिका आयुक्तांनी हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला फारसे यश आले नाही. विद्यमान  महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या कार्यकाळात या उड्डाणपूल पूर्ण होण्यात यश आले आहे. गेल्या दिड वर्षाच्या काळात पुलाच्या कामाचा वेग काही प्रमाणात वाढला. आता पूल बांधून पूर्ण झाला. येत्या काही दिवसात हा पूल वाहतुकीसाठी सुरू होणे अपेक्षित आहे.

अपघात आणि वाहतूक कोंडी टळणार

महापालिकेचा ग्रामीण भाग असलेल्या टिटवाळा, आंबिवली परिसर जोडण्यासाठी हा उड्डाणपूल महत्वाचा ठरणार आहे. या परिसरात मोठे गृहप्रकल्प आकार घेत असल्यामुळे येथील लोकसंख्या कमालीची वाढली आहे. रेल्वे फाटक ओलांडून नागरिकाना, वाहनांना ये-जा करावी लागत असल्याने फाटकात मोठी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी त्रस्त वाहनचालक आणि रेल्वे प्रशासनाकडून केली जात होती. गेला अकरा वर्षात येथील नगरसेवक लोकप्रतिनिधींनी या उड्डाणपुलाचे काम गतीने पूर्ण होण्यासाठी महापालिका प्रशासनाला इशारे देण्यात आले, तरी उड्डाणपुलाचे काम धीम्या गतीनेच सुरु होते. 

‘आपले सरकार’ पोर्टलवरील तक्रारीचा 'निकाल'

प्राणवायू सामाजिक संस्थेने त्यावेळी थेट राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एका निवेदनाद्वारे लक्ष वेधत सदर पुलासाठीची जागा पूर्णपणे संपादित न करताच कंत्राट देणाऱ्या तत्कालीन महापालिका आयुक्त, सबंधित शहर अभियंता, कार्यकारी अभियंत्यांसह सर्व संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि या उड्डाणपुलावर झालेल्या व पुढे होणाऱ्या जादा खर्च त्यांच्याकडून वसूल करून घेण्याची मागणी केली होती. तशी नोंद संबंधितांच्या सेवा पुस्तिकेत घेण्याची मागणीही संस्थेने मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली होती. ‘आपले सरकार’ पोर्टलवर केलेल्या या तक्रारीचा सरकारी पद्धतीने ‘निकाल’ लावण्यात आल्याची खंत संस्थेचे संयोजक तथा पत्रकार प्रविण आंब्रे यांनी व्यक्त केली होती. पुलासाठी मोहोने गेट येथे स्थानिक नागरिकांनी उपोषण देखील करण्यात आले होते. त्यामुळे या उड्डाणपुलाच्या कामाला काही प्रमाणात गती मिळून पुलाचे काम मार्गी लागले.