केडीएमटीचे ९१ कोटींचे अंदाजपत्रक सादर

केडीएमटीचे ९१ कोटींचे अंदाजपत्रक सादर

कल्‍याण (प्रतिनिधी) : 
कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेच्‍या परिवहन उपक्रमाचे (केडीएमटी) व्‍यवस्‍थापक मारुती खोडके यांनी सन २०१९-२० चे ६९०५.४५ लक्ष जमा -खर्चाचे सुधारीत व सन २०२०-२१ चे ९१ कोटी ३६ लाख जमा व रू. ८९२५.८६ लाख खर्चाचे व रू.२१०.०० लक्ष शिल्‍लकेचे अंदाजपञक बुधवारी परिवहन समिती सभापती मनोज चौधरी यांचेकडे सादर केले.

सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात जेएनएनयुआरएम अंतर्गत ११८ बसेस तथा सन २०१५ पूर्वीच्‍या टाटा मेकच्‍या २० बसेस अशा एकुण १३७ बसेस चालविण्‍याचे परिवहन उपक्रमाचे नियोजन असून त्‍या अनुषंगाने जमा-खर्चा अंदाज वर्तविण्‍यात आले आहे. याकरीता कमी पडणारा चालक-वाहक कर्मचारी वर्ग व कार्यशाळेच्‍या कर्मचारी वर्ग किमान वेतनावर ठेकेदारामार्फत उपलब्‍ध करण्‍यावर भर दिला आहे.

परिवहन उपक्रमातील कर्मचा-यांचा थकबाकीपोटी ३२ कोटी ६६ लाखांच्‍या प्रलंबित असून यासाठी २०१९-२० च्‍या सुधारीत अंदाजपत्रकात ३ कोटींची तरतूद सुचविण्‍यात आली आहे. तसेच सन २०२०-२१ च्‍या मुळ अंदाजपत्रकात रु. ५ कोटीची तरतूद करण्‍यात आली आहे. कल्‍याण डोंबिवली महानगरपालिकेच्‍या स्‍मार्ट सिटीमध्‍ये समावेश झाला असून स्‍मार्ट सिटी अंतर्गत ''ट्रान्‍झीट मॅनेजमेंट व्‍हेईकल ट्रॅकींग अॅंड पॅसेंजर इंन्‍फारमेशन सिस्टिम '' सारख्‍या कामांसाठी ३२ कोटींची तरतूद करण्‍यात आली आहे. प्रवासी भाडे सुसुत्रीकरण, खंबाळपाडा आगारामध्‍ये कार्यशाळा उभारणी व सोईसुविधा, गणेशघाट आगार येथे शेड, कर्मचारी दालनाची दुरुस्‍ती, नाल्‍यालगतची रिटेंनिंग वॉल बांधणे शिवाय वसंत व्‍हॅली आगार येथे कार्यशाळा उभारणी व मुलभूत सोईसुविधा उभारणे ही कामे देखील महापालिका स्‍तरावरुन करण्‍याबाबत प्रस्‍तावित करण्‍यात आले आहे.

उत्‍पन्‍न वाढीमध्‍ये वाहतूकीपासून मिळणारे रुपये १६ कोटी ४६ लाख हे सन २०१९-२० च्‍या सुधारीत अंदाजपत्रकात गृहित धरण्‍यात आले आहे. तर रुपये ३० कोटी ४ लाख इतके वाहतूकीचे उत्‍पन्‍न सन २०२०-२१ च्‍या मुळ अंदाजपत्रकात अपेक्षित धरण्‍यात आले, आहे. यामध्‍ये प्रामुख्‍याने प्रवासी टिकीत विक्रीपासून मिळणारे उत्‍पन्‍न तसेच विना टिकीट प्रवासी देड वसूली, विदयार्थी, प्रवासी मासिक भाडे इ. अंतर्भुत आहे. महापालिकेकडून चालू वर्षात महसुली ३५ कोटी व भांडवली ५ कोटींचे अनुदानाची मागणी करण्‍यात आलेली आहे.