वावळोली कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवा - आदिती तटकरे

वावळोली कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवा - आदिती तटकरे

अलिबाग (प्रतिनिधी) : कोरोनाशी संपूर्ण देश, राज्य, जिल्हा संघर्ष करीत आहे. अशा गंभीर परिस्थितीत सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करायला हवे. वावळोली आश्रमशाळा येथील  कोविड केअर सेंटर अद्ययावत ठेवावे, अशा सूचना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी तहसिलदार दिलीप रायन्नावार यांना सुधागड येथे दिल्या.

वावळोली आश्रमशाळा येथील १०० खाटांची व्यवस्था असलेल्या कोविड केअर सेंटरला पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी प्रांत अधिकारी डॉ. यशवंत माने, तहसिलदार दिलीप रायन्नावार, अन्य तालुकास्तरीय अधिकारी  उपस्थित होते.

यावेळी कुमारी तटकरे यांनी सुधागड तालुक्याच्या संबंधित विविध विषयांचा सविस्तर आढावा घेतला आणि तालुका प्रशासनाला आवश्यक त्या सर्व सूचना दिल्या. यावेळी त्यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कोरोना विषाणूचा लढा देताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, असे सांगून नागरिकांनी कोरोना विषाणूबाबत काळजी करू नका तर काळजी घ्या, अनावश्यक घराबाहेर पडू नका, सोशल डिस्टंन्सिंग, सॅनिटायजरचा वापर, स्वच्छता या बाबीही कटाक्षाने पाळा,असे आवाहन केले.