स्वच्छता हाच केंद्रबिंदू ठेवल्यास ठाणे शहराचा कायापालट - आयुक्त

स्वच्छता हाच केंद्रबिंदू ठेवल्यास ठाणे शहराचा कायापालट - आयुक्त

ठाणे (प्रतिनिधी) : 
स्वच्छता हीच सेवा या ब्रीदवाक्यानुसार संपूर्ण भारत देशात स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून प्रत्येक नागरिकांनी स्वच्छता हा केंद्रबिंदू मानून काम केल्यास निश्चितच शहराचा कायापालट होईल, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नुकत्याच झालेल्या मार्गदर्शनपर कार्यशाळेत बोलताना केले.

केंद्र शासनाने स्वच्छता मोहिम अधिक गतीमान करण्यासाठी ‘स्वच्छता हीच सेवा’ हा विषय घेवून मोहिम सुरू केली आहे. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सदरचा उपक्रम प्राधान्याने राबविण्यात यावा अशा प्रकारच्या सूचना महाराष्ट्र शासनाने दिल्या आहेत. ठाणे महापालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमाचा आढावा व स्वच्छता हीच सेवा यावर  महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात येथे आयुक्तांच्या अधिपत्याखाली आज एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, पालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, स्वच्छता निरीक्षक आदी उपस्थित होते.

सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना प्रत्येकांने नैतिक जबाबदारी म्हणून काम करताना यामध्ये प्रत्येक नागरिकाला देखील सामावून घेतले पाहिजे तरच आपण आपले अभियान यशस्वी करु शकू, असे त्यांनी सांगितले. केवळ अभियानापुरते  कार्यक्रम न घेता यामध्ये सातत्य असणे अत्यंत गरजेचे आहे. हे अभियान महापालिका कार्यक्षेत्रात गेल्या चार वर्षापासून राबवित आहोत यामध्ये परिस्थितीनिहाय बदल करणे देखील तितकेच गरजेचे आहे. आज अनेक कारणांमुळे जागतिक तापमानामध्ये वाढ होत आहे हे रोखण्यासाठी प्लॉस्टिक मुक्त शहर पर्यायाने देश करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजेत, असे जयस्वाल म्हणाले.

नागरिकांच्या सोईसाठी ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालये उपलब्ध आहेत, काळानुरूप अद्ययावत शौचालयाची निर्मिती करुन यामध्ये वीज, पाणी व नियमित स्वच्छता यावर देखील भर देणे आवश्यक आहे. कच-याचे संकलन करुन त्याची योग्य विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना करणे देखील आवश्यक आहे. यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जनजागृती करण्याचेही उपक्रम राबविण्यात यावे. शासनाने निर्देशित केल्याप्रमाणे २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशी मोठय़ा प्रमाणात श्रमदान कार्यक्रम आयोजित करावयाचा असून यासाठीही सर्वांनी पुढाकार घ्यावा व जास्तीत जास्त नागरिकांना सहभागी करुन ही मोहिम यशस्वी करावी, असेही आयुक्त संजीव जयस्वाल यांनी नमूद केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे, उपायुक्त अशोक बुरपल्ले, संदीप माळवी, उपनगरअभियंता अर्जुन अहिरे आदी अधिकारी उपस्थित होते.