कोकण कृषी विद्यापीठ गुणवत्तेत देशात ३२ वे

कोकण कृषी विद्यापीठ गुणवत्तेत देशात ३२ वे

दापोली (प्रतिनिधी) : 
देशातील कृषी विद्यापीठाच्या गुणवत्ता रँकिंग यादीत कोकण कृषी विद्यापीठाचा ३२वा क्रमांक आला असून राज्यात कोकण कृषी विद्यापीठ दुसऱ्या क्रमांकावर आले आहे. दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (आयसीआर) जाहिर सदर यादी जाहीर केली आहे.

कृषी विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार विभागांच्या गुणवत्तेचे विश्लेषण भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून दरवर्षी केले जाते. यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात गुणवत्ता अहवाल भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडे सादर करण्यात आला. विद्यार्थ्यांना मिळालेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विविध स्पर्धा परीक्षेतील शिष्यवृत्ती, जनरलमधील रिसर्च पेपर, इत्यादीचा विचार ही रॅकिंग निश्चित करताना केला जातो. यंदा करण्यात आलेल्या गुणवत्ता विश्लेषणानुसार राज्यातील कृषी विद्यापीठामध्ये राहुरी कृषी विद्यापीठ २४ व्या स्थानावर आहे तर डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ ३२ व्या स्थानी आहे. परभणी येथील कृषी विद्यापीठ ४५ व्या क्रमांकावर तर अकोल्याचे डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ ४८ व्या क्रमांकावर आहे. 

कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी कुलगुरू पदाची सूत्रे हाती घेत कृषी विद्यापीठाच्या उन्नतीसाठी अनेक उपयुक्त निर्णय घेतले होते. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून मिळालेल्या चांगल्या रँकिंगमुळे कुलगुरू डॉ. संजय सावंत, कुलसचिव डॉ. प्रमोद सावंत, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, विस्तार संचालक डॉ. संजय भावे, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे आदींचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.