१२ व्या मजल्यावरून पडून मजूर ठार; मजुरांच्या जिविताचा मुद्दा ऐरणीवर

१२ व्या मजल्यावरून पडून मजूर ठार; मजुरांच्या जिविताचा मुद्दा ऐरणीवर

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण नजिकच्या वडवली येथील कोणार्क सॉलीटेअर गृहप्रकल्पात बांधकाम सुरु असताना नुकतेच या प्रकल्पातील इमारतीच्या १२ व्या मजल्यावर काम करणारा एक मजूर खाली पडून दगावल्याची दुदैवी घटना नुकतीच घडली आहे. मजुरांना सुरक्षिततेचे साहित्य दिले गेले नसल्याचे या घटनेने समोर आले असून मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी प्रकल्पाचे विकासक आणि बांधकाम कंत्राटदाराविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यापूर्वीही कल्याणमधील एका गृहप्रकल्पाच्या इमारतीमधून मजूर खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. या घटनांनी बांधकाम मजुरांच्या जिविताचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, वडवली येथे कोणार्क सॉलीटेअर नामक गृहप्रकल्प उभा राहत असून त्यामध्ये १२ मजली इमारती बांधण्यात येत आहेत. पैकी तीन इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले असून त्यांचा निवासी वापर देखील सुरु झाला आहे. त्यालगतच असलेल्या चौथ्या इमारतीचे बांधकाम सुरु असून सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास काही मजूर सदर इमारतीच्या १२व्या मजल्यावर प्लाय काढण्याचे काम करत होते. त्यावेळी अशोक कुमार यादव (मूळ रा. उत्तरप्रदेश ) नामक मजूर डकमधून खाली जमिनीवर पडला. त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच बांधकाम कंत्राटदार शरीफ शब्बीर बेग (४६) याने घटनास्थळी धाव घेतली. कंत्राटदार बेग यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना आपण नोंदणीकृत कंत्राटदार नसल्याचे व कामगारांचा भविष्य निर्वाह निधी व विमा उतरविला नसल्याची कबुली दिली. 

या प्रकरणी विरेंद्रकुमार राजनाथराम कुमार या मजुराने दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.वि. ३०४ (अ) ३४ नुसार बांधकाम कंत्राटदार शरीफ शब्बीर बेग (वय-४६) व कोणार्क सॉलीटेअरचे बिल्डर (विकासक) अशा दोघांविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बोऱ्हाडे करीत आहेत. यापूर्वीही कल्याणमधील एका गृह प्रकल्पाच्या इमारतीचे बांधकाम सुरु असताना एक मजूर खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली होती. या घटनांनी बांधकाम मजुरांच्या जिविताचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.