दफनभूमीचा अभाव; कल्याणमधील मुस्लिम-ख्रिश्चन समाज निवडणुकीत ‘नोटा’ वापरणार?

दफनभूमीचा अभाव; कल्याणमधील मुस्लिम-ख्रिश्चन समाज निवडणुकीत ‘नोटा’ वापरणार?

आंबिवली (सिद्धार्थ गायकवाड) : 
कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या आंबिवली भागातील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाकरता या परिसरात दफनभूमीसाठी जागा नाही. हि समस्या सोडविण्याकडे येथील लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलेले नाही. त्यामुळे नाराज असलेल्या या दोन्ही समाजातील हजारो मतदार विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकून 'नोटाचा' वापर करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

आंबिवली परिसरातील वडवली विभागातील स्थानिक मुस्लिम समाजाकरता विभागात दफनभूमी अस्तित्वात आहे. मात्र इतर परिसरात राहणाऱ्या मुस्लिम समाजातील मयत इसमावर या ठिकाणी दफनविधी करण्यास स्थानिक गावकऱ्यांचा विरोध आहे. येथील अनेक प्रभागात मुस्लिम समाजाचे प्राबल्य असून मयताचे दफनविधी करण्याकरिता त्यांना कल्याण येथील बैल बाजार दफनभूमी गाठावी लागते. आंबिवली स्टेशनच्या बाजूला इराणी समाजाचा कबिला राहत आहे. युतीच्या शासनात या मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार व कामगार मंत्री असणारे साबीर शेख यांनी या समाजाकरता बल्याणी रोड जवळील एनआरसी नायलॉन प्लांटच्या मागे असलेली जागा या समाजासाठी दफनभूमीसाठी उपलब्ध करून दिली होती.

मुस्लिम समाजासारखीच काहीशी परिस्थिती येथे वास्तव्यास असणाऱ्या ख्रिश्चन समाजाचीही आहे. त्यांनाही दफनभूमी करता या परिसरात जागाच नसल्याने दफनविधी करण्याकरता त्यांनाही कल्याण जवळील विठ्ठलवाडी या विभागात शव घेऊन जावे लागत आहे.

यापूर्वी निवडून गेलेल्या खासदार व आमदारांकडे दोन्ही समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे दफनभूमीची जागेची मुद्दा उपस्थित केला होता. मात्र त्यांच्या मागणीला तत्कालीन लोकप्रतिनिधी यांनी वाटाण्याच्या अक्षता दाखवत वेळ मारून नेली आहे. परिणामी येथील मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजातील एखादा व्यक्ती मयत झाल्यास शव टेम्पोमधून अंत्यविधी करिता सात ते आठ किलोमीटर कल्याण या ठिकाणी घेऊन जावे लागत आहे. या निवडणुकीत त्यांनी मतदानावर बहिष्कार वा नोटाचा वापर करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत उमेदवारही गडबडले आहेत. येथील मुस्लिम व ख्रिश्चन समाजाची आठ ते दहा हजार लोकसंख्या आहे. त्यामुळे त्यांनी मतदान करताना नोटाचा वापर केल्यास त्याचा फटका कोण कोणत्या उमेदवारांना बसेल याविषयी तर्कवितर्क व्यक्त होऊ लागले आहेत.