आंबिवलीमध्ये प्रभाग स्वच्छतेचा बोजवारा

आंबिवलीमध्ये प्रभाग स्वच्छतेचा बोजवारा

आंबिवली (प्रतिनिधी) :
सतत गैरहजर राहत असणाऱ्या सफाई कामगारांमुळे कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'अ' प्रभागातील मोहने-गाळेगाव शेडवरील सफाई कर्मचारी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे येथील प्रभागात साफसफाईचा बोजवारा उडाला आहे.

मोहने गाळेगाव हजेरी शेड येथे २००५ च्या दरम्यान एकूण ८० च्या आसपास सफाई कर्मचारी कार्यरत होते. २०१९ साली सफाई कर्मचाऱ्यांची वाढ होण्याऐवजी ती घटली असून कामगारांची संख्या आजमितीस ५० ते ५५ राहिली आहे. एकीकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकसंख्येबरोबरच विविध संकुलने उभी राहत असतांना सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली आहे.

सदर हजेरी शेडवर चार प्रभाग येत असून ५५ च्या आसपास असणाऱ्या या कर्मचाऱ्यांना मधून ३० कर्मचारी हजेरी शेडवर हजर राहत असून उर्वरित कर्मचारी गैरहजर राहत आहेत. प्रभाग क्रमांक १२ गाळेगाव येथे तर दररोज केवळ तीनच सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. सदरचा विभाग हा झोपडपट्टी परिसर म्हणून ओळखला जातो. अन्य प्रभागातही परिस्थिती जैसे थे असल्याने, साफसफाई होत नाही. गटारी तुडुंब भरलेल्या आहेत, नियमितपणे जंतुनाशक फवारणी होत नाही. यामुळे अनेकदा नागरिकांना अस्वच्छतेमुळे दवाखाना गाठावे लागत आहे.

'अ'प्रभाग समितीचे सभापती दयाशंकर शेट्टी यांनी या संदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले की, प्रत्येक प्रभागात सफाई कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याने अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे योग्य प्रकारे साफसफाई होत नाही. मात्र पालिका आयुक्तांकडे वाढीव साफ सफाई कर्मचारी देण्याची मागणी केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात एकाच प्रभागात पाच ते सात जणांना डेंग्यू झाला होता तर, एक रुग्ण डेंग्यूमुळे दगावला होता. अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे साफसफाई होत नसल्याने नागरिक पालिकेच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त करू लागले आहेत. यासंदर्भात प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल यांना विचारले असता ५० कर्मचाऱ्यांची नेमणूक असून यामध्ये कोणी आजारी असल्याने गैरहजर असल्याचे सांगितले आहे.