वृक्षारोपण करून मानवी जीवन सुरक्षित करूया - महापौर विनीता राणे

कल्याण (प्रतिनिधी) :
निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेऊन, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी आपापल्या क्षेत्रात वृक्षारोपण करुन किमान एक तरी झाड लावावे असे आवाहन महापौर विनिता राणे यांनी सोमवारी केले. महाराष्ट्र शासनाच्या ३३ कोटी वुक्ष लवगवड व कल्याण रिंग रोड अंतर्गत पर्यायी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, वन व महसूल विभाग यांच्या संयुक्त विदयमाने आंबिवली येथील वन जमिनी सर्व्हे नं. ११, २५/२ व २७/२ येथे वृक्षारोपण कार्यक्रमा प्रसंगी त्या बोलत होत्या.
मागील वर्षी शासनाने दिलेले ३० हजारचे वृक्ष लागवडीचे लक्ष्य दिले होते, ते आम्ही लोकसहभागातून पूर्ण केले होते. या वर्षीही महापालिका आपले ५० हजार वृक्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करू, असा विश्वास महापौर राणे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी वृक्ष लागवड ही एक व्यापक चळवळ झाली असुन, जगा, जगवा अन् जगू दया हा जीवन मंत्र आत्मसात करुन वृक्षारोपण मोहिमेत सामाजिक बांधिलकीतून सहभागी व्हावे, असेही ते म्हणाले. या उपक्रमात सर्व अभिकरणांनी महापालिकेस सहकार्य केल्या बद्दल कौतुक केले. तर उप वन संरक्षक, ठाणे डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी महापालिकेला राज्य शासनाने या वर्षी ५० हजार वृक्ष लावण्याचे लक्ष दिलेले ते लक्ष यशस्वी करण्यासाठी लोकसहभाग आवयश्क असल्याचे सांगुन, वन विभाग महापालिकेस सहकार्य करेल असे आश्वासन दिले. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकारणचे कार्यकारी अभियंता जयवंत ढाणे यांनी सांगीतले की, रिंग रोडमध्ये बाधीत होणारी झाडे आम्ही तोडत असुन, तोडलेल्या झाडांची उणीव भरुन काढण्यासाठी वृक्ष लागवडीकरीता एमएमआरडीए या उपक्रमाकरीता महापालिकेस निधी देत आहे.
याप्रसंगी महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके, महिला व बालकल्याण समिती सभापती रेखा चौधरी, सभापती परिवहन समिती मनोज चौधरी, सभापती शिक्षण समिती नमिता पाटील, शिवसेनेचे गटनेते दशरथ घाडीगावकर, प्रभाग समिती सभापती दयाशंकर शेट्टी, पालिका सदस्य गोरख जाधव, हर्षाली थवील व आसपासच्या शाळेतील ४५०० विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यकमाचे शिस्तबध्द नियोजन महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी व मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव यांनी केले.