आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न मिळवून देवू- उदय सामंत

आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पन्न मिळवून देवू- उदय सामंत

रत्नागिरी (प्रतिनिधी) : तौक्ते चक्रीवादळात आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले त्यांना अधिक भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्यासोबत सिंधुरत्न निधीतून त्यांना शाश्वत उत्पन्नासाठी प्रयत्न करु, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते.  या बैठकीला अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे तसेच आंबा उत्पादक विवेक भिडे, प्रसन्न पेठे, प्रदीप सावंत आणि कृषि उपसंचालक अजय शेंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

तौक्ते चक्रीवादळात 50 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाले असून याबाबत 2015प्रमाणे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आंबा उत्पादक संघातर्फे करण्यात आली आहे.   याबाबत पंचनामे झाले असले तरी प्रत्यक्षात पीक काढणीस आले असताना पाऊस आल्याने आंबा वाया गेला हे लक्षात घेवून याबाबत सहानुभूतीने तपासणी करुन भरपाई देण्याचा आपण प्रयत्न करु असे सामंत म्हणाले.

आंबा उत्पादकांना शाश्वत उत्पन्नासाठी नव्या कोल्ड स्टोअरेजची बांधणी व वातानुकूलीत वाहतुकींसाठी यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव पणन विभागाने 26 ऑगस्टपूर्वी तयार करावा याबाबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी होणाऱ्या चर्चेत मागणी करुन सिंधुरत्न योजनेतून यासाठी निधी दिला जाईल असेही उदय सामंत यांनी सांगितले.

जैतापूर प्रकल्पाबाबत बैठक...

जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प कार्यालयात काम करणाऱ्या काही स्थानिकांना नोकरीवरुन काढण्यात आले आहे. याबाबतही यावेळी एका बैठकीत चर्चा झाली. स्थानिकांना नोकरीवरुन काढण्यावरुन सामंत यांनी व्यवस्थापन प्रतिनिधींना जाब विचारला व लवकरात लवकर याबाबत निर्णय घ्यावा असे निर्देश दिले.