उजळवूया दाही दिशा ....

उजळवूया दाही दिशा ....

गेल्या दोन वर्षात आपल्यापैकी प्रत्येकाने आपल्या जवळच कोणीतरी गमावलंय. आपल्या सगळ्यांचेच काहीतरी हरवलंय. मानसिक, भावनिक स्तरावर आपले आपल्याशीच काहीतरी बिनसलंय. कोरोनाच्या काळातील दोन वर्षांनी माणसाला जगण शिकवलं. माणसाला समाजशील प्राणी का म्हणतात या प्रश्नाच उत्तर कोरोनाने दिले. आर्थिक सामाजिक सांस्कृतिक स्तरावर समाज म्हणून आपले खुप नुकसान झाले. हजारो-लाखो कामगारांच्या हातच काम कोरोनाने हिरावले. काहींनी आपले माणुसपण शाबूत ठेवून या कठीण काळात एकमेकांना साथ दिली तर काहींनी या महामारीतही संधी साधून माणूसपणालाच हाथ दाखवला. 

संपूर्ण सृष्टिलाच कोरोनाने जखडून घेतले. माणूस नावाच्या प्राण्याला घर नावाच्या पिंजऱ्यात बंद केले. एकीकडे परग्रहावर मानवी वस्ती वसवण्याच्या तयारीत असणाऱ्या माणसाला एका कोरोनासारख्या सूक्ष्म जीवापासून स्वतःची सुटका करून घेता आली नाही. हे खरे म्हणजे आपले प्राथमिक अपयश आहे. अन्न, वस्त्र, निवारा ते आरोग्य आणि शिक्षण या गरजांवर काम करायला आणखी खूप काळ जावा लागणार आहे. भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असणाऱ्या देशाला तर असे speed Breaker परवडणारे नाहीत. 

भविष्यात येणाऱ्या कुठल्याही अशा प्रकारच्या संकटाला सामोर जाण्याची तजवीज आपण आता व्यक्तिगत पातळीवर करणे देखील गरजेच आहे. घट्ट असलेला नात्यांची वीण देखील कोरोनाच्या सुईने सैल केली. वेगवेगळ्य सर्वेमधून पुढे आलेली आकडेवरी डोकं चक्रावणारी आहे. अशावेळी आपण स्वतः मानसिक पातळीवर खंबीर असण गरजेचे आहे. सगळे सोंग करता येतात, पण पैशाचे सोंग करता येत नाही, ही आपल्याकडची प्रसिद्ध म्हण आणि तिचा खरा अर्थ कोरोनाने उलगडवला. जे आहे, जसे आहे ते आपल्या घरात, या परिस्थीतीतून बहुतांश समाज गेला. हातातले काम गेल्याने किंवा कामाला ब्रेक लागल्याने घरात येणारा पैसा थांबला. त्यातुन खांद्यावर घर चालवण्याची जबाबदारी असणारे खंबीर हात देखील सैरभैर झाले. 

दुसऱ्या लाटेनंतर मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत असल्याच चित्र आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन पुर्ववत आणि सुरळीत होताना दिसतेय. मुलांच्या शाळा आणि आई - वडीलांचे कार्यालय, कारखाने सुरु होतायेत. बाजारात सणासुदीची लगबग दिसतेय. निराधारांना आधार देण्याची, मानसिकरीत्या हादरलेल्यांना सावरण्याची, आजूबाजूला जमेल तितकी जमेल तेवढी मदत करण्याची हीच वेळ आहे. आपल्यातील माणुसपण जपत कोरोनाला हरवण्याची हीच वेळ आहे. आपली, आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची, तिसऱ्या लाटेला भारतात प्रवेश करू न देण्याची जबाबदारी आपली आहे आपण ती जबाबदारीने पार पाडुया. मापुसपणाचा प्रकाश पेरत दिवाळीच्या निमिताने दाही दिशा उजळवुया. ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील वाईट माणसातल वाईटपण जाण्याची प्रार्थना करुया. याचवेळी कोरोना जर एक जैवीकयुद्ध असेल तर असली दुर्बुद्धी कुणाही माणसाला यापुढे सुचणार नाही, अशी आशा करुया!

---

लेखक: प्रा. गंगाधर सोळुंके (टिटवाळा).

प्रसिद्ध विचारवंत व लेखक

मोब. नं.: ९९ ३०७७९९८६