कारवाईत हलगर्जीपणा; केडीएमसीचे दोन अधिकारी निलंबित

कारवाईत हलगर्जीपणा; केडीएमसीचे दोन अधिकारी निलंबित

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याण आणि डोंबिवली स्टेशनच्या स्कायवॉकवर फेरीवाले अवैधरित्या बस्तान मांडतात. मात्र, याठिकाणी कारवाई करण्यात अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केला. अशा अधिकाऱ्यांना 'केडीएमसी'च्या नव्या आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. २ प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांसह १ कर्मचाऱ्याला पालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी तडकाफडकी निलंबित केल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सामाजिक संस्था आणि इतरांकडून अनेक तक्रारी आल्यानंतर बुधवारी रात्री महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी कल्याण आणि डोंबिवलीतील स्कायवॉकचा पाहणी दौरा केला. रात्री ११ वाजून गेल्यानंतरही या दोन्ही स्कायवॉकवरुन चालायलाही जागा नसल्याचे आयुक्तांना आढळून आले. फेरीवाल्यांनी स्कायवॉकवर थाटलेल्या अनधिकृत दुकानांबाबत याआधीही नागरिकांनी अनेकवेळा प्रशासनाकडे, संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, या सर्व तक्रारींना केराची टोपली आणि स्कायवॉकवरील अनधिकृत फेरीवाल्यांना रेड कार्पेट अशीच प्रशासनाची भूमिका दिसून येत होती. मात्र, विद्यमान आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी त्याला छेद देत नागरिकांच्या बाजूची भूमिका घेतल्याचे कारवाईने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, फेरीवाल्यांवरील या कारवाईमध्ये डोंबिवलीतील ‘फ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी दिपक शिंदे, कल्याणातील ‘क’ प्रभागक्षेत्र अधिकारी भारत पवार आणि अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख गणेश माने या तिघांना निलंबित केले आहे. एकीकडे या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवलीतील उन्मत्त, बेशिस्त आणि कामचुकार अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. तर दुसरीकडे महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी केलेल्या कारवाईचे नागरिकांनीही स्वागत केले आहे. नागरिकाभिमुख कामाची ही भूमिका आयुक्त यापूढेही कायम ठेवतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.