डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण 

मुंबई (प्रतिनिधी) : दादर येथे चैत्यभूमीवर साजरा करण्यात येणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या (६ डिसेंबर) महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचे प्रमुख वाहिन्यांवरून तसेच विविध माध्यमांतून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. नागरिकांना घरीच हा कार्यक्रम पाहता येईल अशी सोय करण्यात येणार आहे. 

चैत्यभूमी येथे सुरु असलेल्या महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाच्या तयारीचा तसेच इंदू मिल येथे उभे राहत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या बांधकामाचा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. यावेळी मुंडे यांनी डॉ. आंबेडकर स्मारक समितीच्या मुख्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. स्मारकाच्या बांधकामासंदर्भात एमएमआरडीए, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी, स्मारकाचे काम करणारी कंपनी यांच्यासमवेत बैठक घेऊन आढावा घेत ही सर्व कामे दोन महिने अगोदर म्हणजेच मार्च २०२३ पूर्वी झाली पाहिजेत, अशा सूचनाही दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक मार्च २०२३ मध्येच पूर्ण केले जाईल आणि त्याचा लोकार्पण सोहळा १४ एप्रिल २०२३ रोजी केला जाईल, यासाठीची तयारी सुरू असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. डॉ. आंबेडकर स्मारकाच्या दोन्ही तळमजल्याचे काम पूर्ण झाले असून मुख्य प्रवेशद्वार सूचनेनंतर साडेसहा फुटावर नेण्यात आले आहे. इतर कामेही वेगात सुरु असल्याची माहिती मुंडे यांनी दिली. स्मारक बांधकामाच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे असून, या कामाचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी विभागामार्फत सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्वभूमीवर जनतेनी कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन चैत्यभूमी येथे गर्दी करू नये, असे आवाहनही मुंडे यांनी केले.

चैत्यभूमी येथील कार्यक्रमाचे प्रमुख वाहिन्यांवरून तसेच विविध माध्यमांतून लाईव्ह प्रक्षेपण केले जाणार आहे. नागरिकांना घरीच हा कार्यक्रम पाहता येईल अशी सोय करण्यात येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका खर्च करणार असली तरी आवश्यकता पडल्यास सामाजिक न्याय विभागसुद्धा यासाठीचा निधी उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही धनंजय मुंडे यांनी यावेळी दिली. महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी अनुयायांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाईव्ह सोहळ्याच्या माध्यमातून अभिवादन करावे, चैत्यभूमीवर प्रत्यक्ष येणे व गर्दी करणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.