लॉकडाऊनमध्ये शिधापत्रिकाधारकांसह गरजूंनाही धान्यपुरवठा करा

लॉकडाऊनमध्ये शिधापत्रिकाधारकांसह गरजूंनाही धान्यपुरवठा करा

कल्याण (प्रतिनिधी) : लॉकडाऊनसारखी आपत्कालीन परिस्थिती असताना वेळप्रसंगी नियम बाजूला सारून माणुसकी जपत राज्यातील सरसकट सर्वच नागरिकांना धान्य पुरवठा व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची आवश्यकता आहे. या काळात शिधावाटप दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांसह अन्य गरजूंनाही सरसकट धान्यपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीचे कल्याण लोकसभा क्षेत्र अध्यक्ष अॅड. धनंजय जोगदंड यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ईमेलद्वारे पाठविलेल्या निवेदनात केली आहे.

कोविड १९ आजाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता उर्वरित नागरिक गेल्या महिन्याभरापासूनच नागरिक घरीच आहेत. परिणामी गरीब वर्गातील नागरिक- ज्यांचे हातावर पोट आहे अशांना उत्पन्न देखील बंद झाल्याने त्यांच्यावर बिकट परिस्थिती ओढवली आहे. लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत राज्यातील शिधावाटप दुकानदाराकडून ग्राहकांना (शिधापत्रिकाधारक) किरकोळ कारणे पुढे करीत धान्य देण्यास आडकाठी केली जात असल्याचे दिसून येत आहे. 

लॉकडाऊनची परिस्थिती निवळेपर्यंत ज्यांच्याकडे पिवळ्या व केसरी  शिधापत्रिका आहेत त्यांना धान्य देण्यात यावे- जरी त्यांचे आधार नंबर लिंक केलेले असो वा नसो तरी त्यांना नियमित देण्यात येणारे धान्य आणि लॉक डाऊनच्या काळात देण्यात येणारे अतिरिक्त धान्य देण्यात यावे. लॉक डाऊन संपल्यानंतर त्यांच्या आधार लिंक करण्याची प्रक्रिया शिधावाटप कार्यालयाने स्वत:च्या जबाबदारीवर पूर्ण करून घ्यावी. तसेच ज्यांच्याकडे शिधापत्रिका नसतील अशा नागरिकांनाही गरज असल्यास व त्यांनी तशी मागणी केल्यास त्यांना त्यांची नावे-पत्ते, आधार कार्ड झेरॉक्स वा तत्सम कागदपत्रे घेऊन त्यांना नजीकच्या शिधावाटप दुकानातून धान्य देण्यात यावे. लॉक डाऊन संपल्यावर त्यांना शिधापत्रिका देण्याची प्रक्रिया शिधावाटप कार्यालयाकडून तातडीने पूर्ण करून घेण्यात यावी. तसेच लॉक डाऊनच्या काळात पांढरे शिधापत्रिकाधारकांनाही त्यांनी मागणी केल्यास त्यांच्या शिधावाटप दुकानातून त्यांना प्रती व्यक्ती ५ किलो प्रमाणे धान्य देण्यात यावे. त्याची स्वतंत्रपणे नोंद करण्यात यावी, अशी मागणी जोगदंड यांनी केली आहे.

आधार लिंक नाही तर धान्य नाही

कल्याण पूर्व येथील गणेशनगर येथील मे. आर.जे. जयस्वाल या शिधावाटप दुकानात आधार नंबर लिंक नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यास नकार देण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानुसार अॅड. जोगदंड यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी सदर दुकानास भेट दिली असताना सदरहू दुकानदाराने ज्या शिधापत्रिकाधारकांचे आधार नंबर लिंक झालेले नाहीत त्यांना धान्य देता येत नसल्याचे त्यांना सांगितले. सुमारे १ वर्षापूर्वी शिधापत्रिकाधारकांचे आधार नंबर लिंक करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह ग्राहकांनी दिली असतानाही जर ती लिंक झाली नसतील तर त्याचा दोष शिधावाटप यंत्रणेचा आहे. त्यासाठी शिधापत्रिकाधारकांना धान्य न देता वेठीला धरणे अयोग्य आहे- त्यातही सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात तरी अशी आडकाठी कोणत्याही स्थितीत समर्थनीय मानता येणार नाही. अशाच स्वरूपाच्या तक्रारी-परिस्थिती शहरातील अन्य दुकानांमध्येही आहेच.