महाडच्या चाकरमान्याने गावकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी तलीये गावात भरविले शिबीर 

महाडच्या चाकरमान्याने गावकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी तलीये गावात भरविले शिबीर 

महाड (प्रतिनिधी) : महाड तालुक्यातील तलीये गावातील आजारी असलेल्या ग्रामस्थांना ‘ब्रेक दि चेन’मूळे वाहनांच्या सुविधेचा अभाव असल्याने आरोग्य केंद्रात जाता येत नव्हते. ते आजार अंगावर काढत होते. ही बाब या गावाचे सुपुत्र व कल्याण शहरात राहणारे व्यावसायिक तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भोसले यांना समजताच त्यांनी मान्यवर सहकाऱ्यांच्या मदतीने ग्रामस्थांसाठी गावातच आरोग्य शिबीर भरवून ग्रामस्थांची मोठी समस्या दूर केली.

भोसले यांनी गावात भरविलेल्या या आरोग्य शिबिरासाठी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तथा माजी आमदार जगनाथ शिंदे यांनी सर्व प्रकारची औषध पुरवली. कल्याणमधील माजी नगरसेवक नितीन निकम यांनी त्यांना पाच ऑक्सिजन कॅन दिले. सर्व तयारी पूर्ण झाल्यानंतर बुधवारी बौद्ध पौर्णिमेच्या निमित्तावर महाड शहरातून डॉक्टरांचे पथक सोबत घेऊन  तलीये गाव गाठले. सदर शिबिरात गावातील प्रत्येक ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करून त्यांना औषध पुरवण्यात आली. यावेळी गावातील ७० ते ८० जणांचे लसीकरण देखील करण्यात आले. 

सदर कार्यक्रमाला महाड जिल्हा पंचायत समितीच्या सभापती सपना सुभाष मालुसरे, जिल्हा परिषद सदस्य मनोज कालीजकार, महाड तालुका सम्पर्कप्रमुख तुळशीराम पोळ, गावचे सरपंच संपत तांदलेकर, समाजसेवक विठ्ठल पवार आदींसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. डॉक्टरांनी गावात येऊन ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्याची रायगड जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. विजय भोसले अध्यक्ष असलेल्या सहयोग सामाजिक संस्थेने सदर शिबिरासाठी मोलाचे सहकार्य केले.