महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे कल्याणात उद्घाटन

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे कल्याणात उद्घाटन

कल्याण (प्रतिनिधी) : 
५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कल्याण केंद्राचे  उद्घाटन बुधवारी अभिनेता मयूर खांडगे आणि कल्याणचे तहसीलदर दीपक आकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अभिनेता मयूर खांडगे यांनी उपस्थित कलाकार व नात्याप्रेमिंना संबोधित करताना म्हणाले की, नाटक ही शोध प्रक्रिया आहे. ती प्रत्येकाने सुरू ठेवली पाहिजे. ही प्रक्रिया थांबली तर नाटक थांबेल. प्रेक्षकांसमोर आपला अभिनय सादर करत त्यांच्या पसंतीची दाद मिळवा, असा मोलाचा सल्ला स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांना खांडगे यांनी दिला. 

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक पटकथाकार जनार्दन ओक, नाट्य परिषदेच्या कल्याण शाखेचे अध्यक्ष तथा कल्याण केंद्र समन्वयक शिवाजी शिंदे उपस्थित होते. यावेळी बोलताना शिवाजी शिंदे यांनी यंदा या केंद्रात तब्बल २८ नाटके होत असून यातून केवळ तीन नाटकांना अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळणार आहे. यामुळे अनेकांची निराशा होणार हे उघड आहे. मात्र स्पर्धकांनी आपली नाराजी किंवा तक्रारी मांडण्यासाठी सोशल मिडिया आणि माध्यमाचा वापर करू नये. तसेच या केंद्रावरील नाटकाची संख्या दरवर्षी वाढत असल्यामुळे केंद्राची संख्या वाढविण्याचे तसेच संस्था आणि कलाकाराच्य सोयीसाठी दोन सत्रात होणाऱ्या स्पर्धा एका सत्रात घेण्यासाठी राज्य शासनाच्या संस्कुर्तिक संचालनालयाच्या संचालकाशी सकारात्मक चर्चा सुरु असल्याची माहिती दिली. 

स्पर्धेचे उद्घाटक तहसीलदार आकडे यांनी  या स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. या स्पर्धेचे परीक्षण करण्यासाठी शासनाकडून   देवेंद्र यादव, दत्तात्रय सावंत व ज्योती निसळ या परीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल ठाणगे, संजय गावडे, स्वप्नील चांदेकर, राजा परदेशी यांनी परिश्रम घेतले.