कल्याण शहरासाठी महाविकास आघाडीने एक रुपया दिला नाही- कपिल पाटील

कल्याण शहरासाठी महाविकास आघाडीने एक रुपया दिला नाही- कपिल पाटील

कल्याण (प्रतिनिधी) : महाविकास आघाडीने दोन वर्षात कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघात विकासासाठी एकही पैसा निधी आणला नसून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निधीतून अजूनही विकास कामे सुरू आहे, हाच देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांच्या काम करण्याच्या पद्धतीत फरक असल्याने आगामी पालिकेच्या निवडणूकांमध्ये भाजपाचीच सत्ता येणार, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी येथे केले.

कल्याणचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यामार्फत आणलेल्या विशेष निधीतून मंजूर झालेल्या स्व. लक्ष्मीबाई सिताराम कारभारी उद्यानाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार, कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, कल्याण शहर अध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, नगरसेवक वरूण पाटील, प्रिया शर्मा, संजय कारभारी, गणेश कारभारी, प्रकाश पाटील, सुचिता कारभारी, मेघनाथ भंडारी, जनार्धन कारभारी, विनायक कारभारी, कृष्णा कारभारी, गणेश कारभारी, गंगाराम कारभारी, मोतीराम कारभारी, प्रविण कारभारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते

या उद्यानात तरुणांना व्यायामाची आवड निर्माण व्हावी यासाठी ओपन जिम, मॉर्निंग वॉकसाठी जॉगिंग ट्रॅक व जेष्ठ नागरिकांसाठी बैठक व्यवस्था तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्याची साहित्य या उद्यानात उपलब्ध करून देण्यात आले आहे. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी विकसित केलेली ही उद्याने पूरक असल्याचेही कपिल पाटील यांनी सांगितले.