यंत्रणा स्वच्छ राखण्यासाठी स्वातंत्र्यदिनी महावितरणने उचलले पाऊल !

यंत्रणा स्वच्छ राखण्यासाठी स्वातंत्र्यदिनी महावितरणने उचलले पाऊल !

कल्याण (प्रतिनिधी) :
महावितरणच्या कल्याण परिमंडळ कार्यालयात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुख्य अभियंता रफिक शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संपूर्ण परिमंडळात सब स्टेशन, डबल पोल स्ट्रक्चर, रोहित्र आदी यंत्रणा याची स्वच्छता करण्यात आली. तसेच नागरिकांना महावितरणची यंत्रणा स्वच्छ राखण्यासाठी आवाहन करणारे फलक लावण्यात आले. तसेच संबंधित सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना महावितरण यंत्रणेजवळील कचरा कुंड्या हलवण्याबाबत पत्र देण्यात आले आहे.

मुख्यालय परिपत्रकाप्रमाणे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने महावितरण यंत्रणेची स्वच्छता करण्याचे आदेश दिले. ‘या स्वछता मोहीम व स्वच्छते बाबत आवाहन करणाऱ्या फलकामुळे नागरिकांच्यात जागृती होण्यास मदत होईल. यामुळे महावितरण यंत्रणा स्वच्छ व सुरक्षित राहून ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देता येईल. तसेच कचऱ्यामुळे प्राण्यांचे होणारे अपघात व बाधित होणारा वीज पुरवठा यांचे प्रमाण कमी होईल’, असा विश्वास मुख्य अभियंता रफिक शेख यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान,  महावितरणच्या येथील कोकण प्रादेशिक कार्यालयात सहव्यवस्थापकीय संचालक विजयकुमार काळम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा निश्चय सर्वांनी केला.

याप्रसंगी अधीक्षक अभियंता सुनिल काकडे, विजय मोरे, ज्ञानेश कुलकर्णी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, सहा.महाव्यवस्थापक धैर्यशील गायकवाड आदी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मुख्य अभियंता रफिक शेख यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे महावितरणच्या ठिकठिकाणच्या यंत्रणेवर ग्राहकांना कचरा न टाकण्याबाबत जागरूक करणारे फलक महावितरणच्या यंत्रणांवर अधिकारी-कर्मचाऱ्यांमार्फत लावण्यात आले.