डोंबिवलीतील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील – राजेश मोरे

डोंबिवलीतील महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील – राजेश मोरे

डोंबिवली (प्रतिनिधी) : 
कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास शिवसेनेचे डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी व्यक्त केला. मोरे यांच्यावर या दोन्ही मतदारसंघातील प्रचार यंत्रणेची धुरा आहे. त्यानिमित्ताने ‘कोंकण वृत्तांत’ने त्यांच्याशी संवाद साधला असता ते बोलत होते. 

कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे रमेश म्हात्रे हे उमेदवार असून डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी महायुतीमधील घटक पक्षांचे कार्यकर्ते झपाटून कामाला लागले आहेत अशी माहिती मोरे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली, चौक सभा, पत्रक वाटप, घरोघर मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देण्यात येत आहे. जाहीर सभांच्या माध्यमातून पक्षाचे नेतेही या दोन्ही मतदारसंघात प्रचारसभा घेत आहेत. त्याचप्रमाणे सोशल मिडीयावरूनही उमेदवारांचा प्रचार केला जात आहे.

महायुतीमधील घटक पक्षांच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या साथीने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत महायुतीने केलेली विकास कामे पोहोचवण्यात येत आहेत. तसेच शिवसैनिकांचे निवडणुका लढविण्याचे खास असे तंत्र आहे. त्यामुळे महायुतीचे हे दोन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील, अशी मला खात्री असल्याचे एका प्रश्नाला उत्तर देताना मोरे यांनी सांगितले.