ठाणे जिल्ह्यावर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

ठाणे जिल्ह्यावर महायुतीचे निर्विवाद वर्चस्व

ठाणे (प्रतिनिधी) : 

ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांपैकी महायुतीने लढलेल्या जागांपैकी भाजपने आपल्याकडील ९ पैकी ८ जागा जिंकल्यात तर शिवसेनेला ९ पैकी ५ जागा जिंकता आल्या. तसेच राष्ट्रवादीने २ तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना, समाजवादी पार्टी व भाजप बंडखोर प्रत्येकी एका जागेवरून निवडून आले. महायुतीने १४ जागा जिंकत जिल्ह्यावरील आपले वर्चस्व सिद्ध केले.

जिल्ह्यात महायुतीमधील शिवसेना ९ आणि भाजप ९ असे १८ विधानसभेच्या जागा लढवत होते. त्यापैकी ८ जागांवर भाजपचे आमदार निवडून आले तर एका जागेवर भाजप बंडखोर जिंकला. त्याचप्रमाणे शिवसेनेने ५ जागेवर विजय मिळवला तर ४ जागा सेनेला गमवाव्या लागल्या. दोन जागेवर राष्ट्रवादी तर प्रत्येकी १ जागा मनसे आणि समाजवादी पार्टीने जिंकल्या. 

भाजपने जिंकलेल्या जागा...

किसन कथोरे यांनी मुरबाड मतदारसंघात राष्ट्रवादीच्या प्रमोद हिंदुराव यांना धूळ चारली. संजय केळकर यांनी ठाणे मतदारसंघात मनसेच्या अविनाश जाधव यांचा पराभव केला. गणेश नाईक ऐरोलीमधून जिंकले. मंदा म्हात्रे यांनी आपला बेलापूर मतदारसंघ राखला. राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली मतदारसंघातून मनसेच्या मंदार हळबे यांचा दणदणीत पराभव केला. महेश चौघुले भिवंडी पश्चिम मतदारसंघातून एमआयएमच्या उमेदवाराचा निसटत्या मतांनी पराभव करण्यात यशस्वी झाले. कुमार आयलानी यांनी उल्हासनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या ज्योती कालानी यांचा निसटता पराभव केला. गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे बंडखोर धनंजय बोडारे यांचा पराजय केला. मीरा भाईंदर येथून भाजप बंडखोर गीता जैन यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराला हरवले.

शिवसेनेने जिंकलेल्या जागा...

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (ठाणे), प्रताप सरनाईक (ठाणे), बालाजी किणीकर यांनी अंबरनाथ मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्रीक साधली. विश्वनाथ भोईर यांनी कल्याण पश्चिम मतदारसंघातून भाजप बंडखोर नरेंद्र पवार यांचा पराभव केला. शांताराम मोरे यांनी भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून विजय मिळवला.

राष्ट्रवादीने जिंकलेल्या जागा...

दौलत दरोडा यांनी शहापूर मतदारसंघातून शिवसेनेचे पांडुरंग बरोरा यांचा पराभव केला तर जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्रा-कळवा मतदारसंघातून शिवसेनेच्या दिपाली सय्यद यांचा प्रचंड मतांनी पराजय केला.

मनसे-सपाचे शिलदार

तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेनेचे रमेश म्हात्रे यांचा पराभव केला, तर समाजवादी पार्टीचे रईस शेख यांनी भिवंडी पूर्व मतदारसंघातून विजय मिळवला.