वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे निधन 

वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिव गोरक्षकर यांचे निधन 

शहापूर (प्रतिनिधी) : 
ज्येष्ठ वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिव वसंत गोरक्षकर (८६) यांचे आज पहाटे शहापूर तालुक्यातील भातसई येथील निवासस्थानी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. लेखन, कला समीक्षक व संग्रहालय तज्ञ अशा विविध क्षेत्रात त्यांचे प्रभुत्व होते.

आज सायंकाळी ५ वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासकीय अधिकारी व पंचक्रोशीतील गावकरी आणि त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात मुलगा मुकुंद, सून आणि दोन नातवंडे असा परिवार आहे. इतिहासाचे आकलन करण्यात त्यांनी केलेले कार्याचा गौरव म्हणून त्यांना २००३ सालच्या पद्मश्री सन्मानाने गौरविण्यात आले. 'छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालया'चे (प्रिन्स ऑफ वेल्स म्युझीयम) संचालक म्हणून गोरक्षकर यांनी काम पाहिले होते.

गोरक्षकर यांची ‘राजभवन्स इन महाराष्ट्र’, ‘अ‍ॅनिमल्स इन इंडियन आर्ट’, ‘द मॅरिटाइम हेरिटेज ऑफ इंडिया’, ‘कार्ले केव्हस ऑफ वेस्टर्न इंडिया’, ‘कालिदास अँड द महायोगी ऑफ घारापुरी’ यासारखी अनेक पुस्तके प्रकशित झाली आहेत. त्यांचे गाजलेले ‘डॉन ऑफ सिव्हिलायजेशन ऑफ महाराष्ट्र’ या ग्रंथात उत्खननातून हाती आलेल्या तिसऱ्या शतकातील महाराष्ट्रातील प्रागैतिहासिक नमुन्यांच्या आधारे इतिहासाच्या प्रदीर्घ कालौघातील महाराष्ट्राचा चित्र वर्णित आहे. कोकणातील देवरूख येथील लक्ष्मीबाई पित्रे कलासंग्रहालय गोरक्षकर यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आले होते.

गोरक्षकर यांच्या निधनावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त करीत ज्येष्ठ वस्तुसंग्रहालय तज्ज्ञ पद्मश्री सदाशिवराव गोरक्षकर यांच्या निधनाने भारतीय इतिहासाचा समृद्ध वारसा जतन करण्यासाठी आयुष्य वेचलेले एक समर्पित व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे.