मराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा- डॉ. विजय सूर्यवंशी

मराठी भाषेच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा- डॉ. विजय सूर्यवंशी

कल्याण (प्रतिनिधी) : मराठी आपली मायबोली असून तिच्या संवर्धनाचा जास्तीत जास्त प्रयत्न करावा, असे उद्गार महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी काढले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त महापालिका मुख्यालयाच्या प्रांगणात भरविलेल्या पुस्तक प्रदर्शनाच्या उद्घाटनासमयी त्यांनी हे उद्गार काढले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त महापालिकेने आयोजिलेल्या पुस्तक प्रदर्शनात अनेक प्रकाशकांनी हिरीहिरीने भाग घेतला असून या प्रदर्शनाचा जास्तीत जास्त नागरीकांनी-वाचकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त सूर्यवंशी यांनी यावेळी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने अनेक विविध उपक्रम राबविलेले असून यामध्ये बुधवार २० व  गुरूवार२१ जानेवारी २०२१ रोजी कल्याण मुख्यालयाच्या प्रांगणात‍ आणि २३ जानेवारी व २४ जानेवारी २०२१ रोजी डोंबिवली विभागिय कार्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात, मॅजेस्टीक प्रकाशन, नवनीत प्रकाशन, मेहता प्रकाशन आदी ख्यातनाम प्रकाशकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात कल्याण मधील १५६ वर्षे जुन्या सार्वजनिक वाचनालयाने आपल्याकडील दुर्मिळ पुस्तके वाचकांच्या अवलोकनासाठी ठेवली आहेत.

यावेळी प्रदर्शनातील जास्तीत जास्त पुस्तके विकत घेणा-या व्यक्तींचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. या उद्घाटनसमयी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, उपायुक्त पल्लवी भागवत, रामदास कोकरे, जनसंपर्क विभागप्रमुख संजय जाधव, कर निर्धारक संकलक विनय कुलकर्णी, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, अत्रे रंगमंदिराचे माणिक शिंदे, सावित्रीबाई नाट्यगृहाचे दत्तात्रय लदवा, सरस्वती ग्रंथ भंडाराचे मनोज संत, सार्वजनिक वाचनालय कल्याणचे राजीव जोशी, फ्रेन्डस लायब्ररीचे श्री.पै पपायरसचे भूषण कोलते व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रदर्शनाच्या सुरुवातीलाच काही नागरिकांनी रु.१२००,रु.१५०० रक्कमेची पुस्तके खरेदी करुन प्रदर्शनास उत्साही प्रतिसाद दिला. याप्रसंगी आयुक्त विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना देवनपल्ली कोळी यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी वर्गानेही पुस्तके खरेदी करुन पुस्तक प्रदर्शनात आपला उत्स्‍फुर्त सहभाग दर्शविला.बुधवारी दुपारपर्यंत ५० हजार रक्कमेच्या सुमारे ५०० पुस्तकांची विक्री या प्रदर्शनात झाली. घनकचरा विभागाने सुरू केलेल्या ‘शुन्य कचरा मोहिमे’तून  संकलित झालेल्या कापड्यातुन महिला बचत गटाने शिवलेल्या कापडी पिशव्या देखील माफक दरात उपलब्ध झाल्याने कापडी पिशव्या विक्रीतुन महिला बचत गटांना रोजगाराचा सुर गवसल्याचे यानिमित्ताने दिसले.