महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते वाद्यवृंद कलाकारांना अन्नधान्याचे वाटप

महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते वाद्यवृंद कलाकारांना अन्नधान्याचे वाटप

ठाणे (प्रतिनिधी) : कलाकार हे आपल्या कलेच्या माध्यमातून रसिकांच्या मनात आनंद निर्माण करत असतात, विरंगुळा देत असतात परंतु कोरोनामुळे गेले दीड वर्षे सांस्कृतिक कार्यक्रम बंद आहेत, याचा फटका वाद्यवृंद कलाकारांना देखील बसला असून त्यांचा रोजगार पूर्णपणे बंद आहे, या कलाकारांना मदतीचा हात देण्याच्या हेतूने महापौर नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने शनिवारी वाद्यवृंद कलाकारांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

ठाण्यातील तीन हात नाका येथील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे आज (14 ऑगस्ट) मराठी वाद्यवृंद कलाकारांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सिनेदिग्दर्शक विजू माने,वाद्यवृंद निर्माता संघाचे अध्यक्ष उदय साटम, प्रमुख कार्यवाह बाळा पांचाळ तसेच कलानिधी समिती, ठाणेचे अध्यक्ष नरेंद्र बेडेकर, उदय साटम आदी उपस्थित होते.

कोविड 19 चा फटका हा समाजातील सर्व घटकांना बसला आहे. गेले दीड वर्षे नाट्यगृह बंद असल्यामुळे तसेच सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्यामुळे वाद्यवृंद कलाकारांचा फार मोठे नुकसान झाले आहे. या कलाकारांना सहकार्य करण्याच्या उद्देशाने महापौर नरेश म्हस्के यांच्या वतीने कलानिधी ठाणे समितीच्या माध्यमातून या कलाकारांना मदतीचे वाटप करण्यात आले. मध्यमवर्गीय कुटुंबातील हे वाद्यवृंद कलाकार जरी असले तरी सध्या रोजगार बंद झाला आहे, मात्र स्वत:हून मदत मागण्यासाठी कलाकारांना संकोच वाटतो, हे ओळखून महापौरांनी स्वत:हून या मदतीसाठी पुढाकार घेतला. यावेळी जवळपास ४०० हून अधिक वाद्यवृंद कलाकार उपस्थित होते.  यापूर्वीही रंगमंच कलाकारांना, कुष्ठरूग्ण बांधवांना, दिव्यांग बांधवांना देखील महापौर नरेश म्हस्के यांच्या वतीने अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.