वारकरी संप्रदायाकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वारकरी संप्रदायाकडून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

पंढरपूर (प्रतिनिधी) : 
वारकरी संप्रदायाने पर्यावरण संवर्धनाचा संदेश सर्वप्रथम दिला. हा संदेश पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमाने दिला आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभाग यांच्या वतीने आयोजित पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या उपक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत समारोप झाला. त्यावेळी ते बोलत होते.

शासकीय विश्रामधामच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास अमृता फडणवीस, पशुसंवर्धन दुग्धविकासमंत्री महादेव जानकर,  सामाजिक न्यायमंत्री  सुरेश खाडे,  पालकमंत्री विजय देशमुख, आमदार भारत भालके, रामहरी रुपनवर, माजी मंत्री बबनराव पाचपुते आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आपल्या समोर आज पर्यावरण संवर्धनाचे आव्हान आहे. राज्य शासनाने प्रदूषण कमी करण्यास प्राधान्य दिले आहे. त्या अनुषंगाने धोरणे आखली जात आहेत. झाडे लावण्याची मोहिम लोकचळवळ झाली. त्यामुळेच राज्यात यंदा तेहतीस कोटी झाडे लावण्यात आली. प्लास्टिक बंदी केल्यामुळे वापर कमी झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी उपक्रमातून आळंदी ते पंढरपूर दरम्यान पालखी मार्गावर लोककलेच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण, पाण्याचे संवर्धन,  प्लास्टिकचा वापर टाळणे असे संदेश देण्यात आले. महाराष्ट्र कला संस्कृती मंचने आळंदी ते पंढरपूर दरम्यान जनजागृती केली. पर्यावरण विभागाचे सचिव ई रवींद्रन, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आदी याप्रसंगी पस्थित होते. दरम्यान, यावेळी नमामि चंद्रभागा प्रकल्पावर आधारित प्रबोधनपर माहितीपटाचे अनावरण करण्यात आले.  विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी या उपक्रमाबाबत माहिती दिली.