मीटर रिडींग कंत्राटदार, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई होणार- रफिक शेख 

मीटर रिडींग कंत्राटदार, कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास कारवाई होणार- रफिक शेख 

कल्याण (प्रतिनिधी) :
० ते ३० वीज युनिट वापरणाऱ्या ग्राहकांवर लक्ष ठेवा. तसेच मीटर रिडींगच्या कामात हलगर्जीपणा केल्यास कंत्राटदार व त्यांचे कर्मचारी यांच्यावर कडक करवाई करण्याचे आदेश मुख्य अभियंता रफिक शेख यांनी फिल्डवरील अधिकाऱ्यांना दिले आहेत. महावितरणच्या वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली करणे आवश्यक असून त्यादृष्टीने फिल्डवरील अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांच्याकडून घेण्यात येत आहे.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी जून महिन्यात मुख्यालयात बैठक घेऊन घरगुती, वाणिज्य व औद्योगिक ग्राहकांच्या वीज बिल वसुलीवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कल्याण परिमंडळातील सर्व उपविभागाचा आढावा मुख्य अभियंता रफिक शेख यांच्याकडून घेण्यात आहे. फिल्डवरील सहायक अभियंता, कनिष्ठ अभियंता, लाईनमन यांच्याशी ते संवाद साधत आहेत.

ग्राहकांचे ठराविक कालावधी नंतर वारंवार होणारे क्रेडिट बिल, ०ते ३० युनिट वीज वापर असणारे ग्राहक यांच्यावर लक्ष ठेवा. तसेच आय.टी. विभागाच्या अहवालानुसार एखाद्या ग्राहकाचे मीटर नादुरुस्त असल्याचे लक्षात आल्यास असे मीटर तात्काळ बदला. टॅपिंग काढून ग्राहकाच्या मीटर पर्यंत असलेली सर्विस वायर दिसेल अशा स्वरूपात करा. वीज जोडणी घेताना ग्राहकाने मंजूर करून घेतलेल्या भारानुसार (लोडनुसार) त्या ग्राहकाचा वीज वापर आहे का हे तपासा. मंजूर २० किलोवॅट भारापेक्षा अधिक वीज वापरली जात असेल तर अशा ग्राहकांवर नियमानुसार कारवाई करा,  असे स्पष्ट आदेश रफिक शेख यांनी यावेळी दिले आहेत. 

फिल्डवरील शेवटच्या घटकांपर्यंत संवाद साधल्यामुळे वरिष्ठ व्यवस्थापनाची भूमिका शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत पोहचते. तसेच कर्मचाऱ्यांना फिल्डवरील कामात येणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी ही संवाद मोहीम उपयुक्त असून यामुळे ग्राहक सेवेत अधिक सकारात्मक बदल होणार आहे, असे मत कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफिक शेख यांनी व्यक्त केले.