कोट्यावधी शिवप्रेमींनी अनुभवला शिवराज्याभिषेक दिन सोहळा!

कोट्यावधी शिवप्रेमींनी अनुभवला शिवराज्याभिषेक दिन सोहळा!

रायगड (विठ्ठल जवक) :
अखिल भारताचा स्वाभिमान मानला जाणारा शिवराज्याभिषेक दिन सोहळा कोरोना संसर्गामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून व लॉकडाऊनमुळे मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत शनिवारी रायगडावर साजरा झाला. यंदाच्या सोहळ्याचेही फेसबुकवरून थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यामुळे घरबसल्या देशातील कोट्यावधी शिवप्रेमींनी शिवराज्याभिषेक दिनाचा सोहळा अनुभवला. घरांवर भगवा झेंडा फडकावत मावळ्यांनी छत्रपतींना अभिवादन व्यक्त केले.
 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाबरोबरच त्यांचे आदर्श ठरलेले लोककल्याणकारी राज्य डोळ्यांसमोर ठेऊन किल्ले रायगडावर जाऊन छत्रपतींच्या मावळ्यांनी शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याची परंपरा अखंड राखली. २००७ पासून अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन समितीच्या वतीने शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात येत आहे. हा सोहळा आता लोकोत्सव बनला असून दरवर्षी सोहळ्याला लाखो शिवप्रेमी रायगडावर उपस्थित राहतात. दरवर्षी सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्या शिवप्रेमींची संख्या वाढतच जात आहे. मात्र यंदाचे वर्ष कोरोना संसर्गामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा हा सोहळा साधेपणात व मोजक्या मावळ्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. 

शनिवारी पहाटे दाट धुक्याची शाल पांघरलेल्या किल्ले रायगडावरील नगारखान्यासमोर युवराज शहाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते सर्वप्रथम ध्वजारोहण संपन्न झाला व शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याला प्रारंभ झाला. ध्वजारोहण झाल्यानंतर खासदार संभाजीराजे भोसले, युवराज शहाजीराजे, यांनी उत्सवमूर्ती पालखीने राजसदरेकडे प्रस्थान केले. यावेळी जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी असा घोषणा देण्यात आल्या. राजसदरेवर संभाजीराजे व शहाजीराजे यांनी मेघडंबरीमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले. यावेळी शिवाजी महाराजांच्या हस्ते छत्रपतींच्या पुतळ्यास जलाभिषेक व सुवर्ण नाण्यांचा अभिषेक करण्यात आला. यावेळीही शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार करण्यात आला. या सोहळ्याला मोजके २५ मावळे उपस्थित होते. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक दिन समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे, विनायक फाळके, वरूण भामरे, संजय पोवार आदी सहभागी झाले होते. 

याप्रसंगी उपस्थितांशी सवांद साधताना खा. संभाजीराजे यांनी निसर्ग चक्रीवादळाने रायगड जिल्ह्याला मोठा फटका बसला असल्याने जिल्ह्याच्या मदतीसाठी सरकारने आर्थिक पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली. तसेच रायगडमधील २१ गावांच्या परिसरासाठी सुसज्ज प्राथमिक केंद्र उभारण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

शिवछत्रपतींचा वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊया - उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी कारभाराचा जगापुढे आदर्श आहे. त्याअर्थाने शिवराज्याभिषेक दिन हा संकल्प दिन मानून शिवछत्रपतींनी दिलेला वसा पुढे नेण्यासाठी वचनबद्ध होऊया, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. 
शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला एक अपूर्व मंगल क्षण. क्षणोक्षणी केवळ रयतेच्या सुखाचा विचार करणाऱ्या शिवछत्रपतींवर अढळ श्रद्धा ठेवून वाटचाल करण्याचा हा संकल्प दिन. त्यांचा लोक कल्याणकारी राज्य कारभार जगात आदर्श मानला जातो. आव्हानांवर मात करताना धीरोदात्तपणे पुढे जाण्याचा त्यांचा बाणा आज मार्गदर्शक ठरतो आहे. त्यांनी दाखविलेल्या वाटेवरून पुढे जाण्यासाठी,  दिलेला हा वसा आणि वारसा पुढे नेण्यासाठी आपण वचनबद्ध होऊया.

महाराजांचे शौर्य महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत राहील- अजित पवार

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात रयतेचे राज्य आणत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. ‘प्रजा सुखी तरंच राजा सुखी’ या न्यायाने राज्यकारभार केला. महान योद्धा, कुशल प्रशासक, लोककल्याणकारी, प्रजाहितदक्ष राजा ही ओळख निर्माण केली. राजनिती, युद्धनिती, अर्थकारण, मानवतावाद, पर्यावरणसंवर्धन कुशलतेसह, भविष्याचा वेध घेण्याचे द्रष्टेपण असलेले ते राजे होते. त्यांनी गाजवलेले शौर्य, केलेला पराक्रम, घालून दिलेला राज्यकारभाराचा आदर्श महाराष्ट्राला सदैव प्रेरणा देत, मार्गदर्शन करीत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना त्रिवार वंदन केले व जनतेला शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.