केडीएमसीमधील घंटागाडी कामगारांना किमान वेतन लागू 

केडीएमसीमधील घंटागाडी कामगारांना किमान वेतन लागू 

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या घंटागाडी, डम्पर, प्लेसर आणि आरसी गाड्यांमार्फत शहरातील कचरा गोळा करून डम्पिंग ग्राऊंडवर नेण्यासाठी नेमलेल्या वाहनचालक व सफाई कामगारांना प्रदीर्घ लढ्यानंतर थकबाकीसह सुधारित किमान वेतन मिळण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. या मागणीसाठी श्रमिक जनता संघाने पाठपुरावा चालविला होता. अखेरीस त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. 

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ४ ऑगस्ट रोजी परिपत्रक काढून दि. २४ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार मागील थकबाकीसह सुधारित वेतन लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार अकुशल कामगारांना मूळ वेतन रु ११ हजार ५००/- अर्धकुशल कामगारांना रु १३ हजार आणि कुशल कामगारांना रू. १४ हजार आणि वेळोवेळी जाहीर झालेल्या विशेष भत्ता यासह कायद्याने लागू अन्य भते व सोयी सुविधा देणे आवश्यक असते. या आदेशानुसार वेतन मिळण्यासाठी घंटागाडीवरील कामगारांनी कायमस्वरूपात महापालिकेच्या सेवेत सामावून कायम कामगारांच्या सारखे वेतन, भत्ते आणि सोयी सुविधा मिळण्यासाठी औद्योगिक न्यायालयात धाव घेतली होती. 

या सुमारे शंभर कामगारांना महिना ७८ हजार रुपये या तुटपुंजे वेतनावर राबविले जात होते. परिणामी ते कायदेशीर किमान वेतनापासून वंचित होते. श्रमिक जनता संघ या युनियनच्या अध्यक्षा मेधा पाटकर व सरचिटणीस जगदीश खैरालिया यांच्या मार्गदर्शनाखाली कामगार आयुक्त व मंत्रालय पातळीवर पाठपुरावा करण्यात येत होता. अखेरीस महापालिका प्रशासनाने या संदर्भातील परिपत्रक काढत सदरच्या कामगारांना सुधारित कायदेशीर किमान वेतन पूर्वलक्ष्यी प्रभावाने देण्याचे आदेश काढले. महिन्याला ७/८ हजार वेतनाच्या जागी आता दुप्पटीपेक्षा अधिक वेतन हाती पडणार असल्याने कामगारांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. कामगारांची महत्वाची मागणी पूर्ण करण्यात जनता श्रमिक संघाला यश मिळाल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया चिटणीस सुनील कंद यांनी व्यक्त केली आहे. 

महापालिका आयुक्तांनी सुधारित किमान वेतन लागू करून कामगारांना न्याय दिल्याबद्दल सरचिटणीस जगदीश खैरालिया यांनी आभार मानले आहेत. श्रमिकांना सुधारित किमान वेतन लागू झाल्याने काही प्रमाणात यश मिळाल्याने घंटागाडी कामगारांच्या लढ्याचा एक पाऊल पुढे पडला असला तरी, घंटागाडी कामगार हे कायम कामगारांप्रमाणेच सेवा देत असल्याने त्यांना कायमस्वरूपी नोकरी व कायम कामगारांच्या सारखे वेतन, भत्ते आणि सवलती मिळण्यासाठी श्रमिक जनता संघ प्रयत्नशील राहणार असल्याचे खैरालिया सांगितले.