गाडीने फेरफटका मारत मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन

गाडीने फेरफटका मारत मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले रेल्वे उड्डाणपुलाचे उद्घाटन

टिटवाळा (प्रतिनिधी) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका व रेल्वे प्रशासनाने संयुक्तपणे बांधलेला व सुमारे अकरा वर्षे संथगतीने पूर्णत्वास आलेल्या बहुचर्चित वडवली रेल्वे उड्डाणपुलाचे शनिवारी सायंकाळी राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाडीनेच उड्डाणपुलावरून फेरफटका मारून लोकार्पण केले. यावेळी राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने प्रशासनाच्या उपस्थितीत सामाजिक अंतराच्या नियमाचा येथे फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले. 

नगरविकासमंत्री शिंदे तब्बल दीड तास उशिराने कार्यक्रमाच्या ठिकाणी वडवली येथे पोहोचले. शिंदे यांनी गाडीतून खाली न उतरता गाडीतूनच उड्डाणपुलावरून फेरफटका मारून पुलाचे उद्घाटन केले. त्यामुळे लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी आणलेले पुष्पगुच्च, शाल व इतर तयारी वाया गेली. यावेळी भाजपाचे भिवंडी लोकसभेचे खासदार कपिल पाटील, डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण, कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रविंद्र फाटक, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी, रेल्वेचे मंडळ प्रबंधक शलब गोयल, माजी नगरसेविका सुनंदा मुकुंद कोट, हर्षाली थवील, माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी, दुर्याधन पाटील, दशरथ तरे, परिवहन समितीचे माजी सभापती रमेश कोनकर, मनोज चौधरी आदी उपस्थित होते.

गेल्या सोमवारी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी या पुलाचे उद्घाटन करून वाहतुकीसाठी खुला केला. मात्र तो अर्धा तासातच बंद करण्यात आला होता. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने शनिवारी अधिकृतपणे पुलाच्या उद्घाटनाचा अधिकृत कार्यक्रम नगरविकासमंत्र्यांच्या हस्ते आयोजित केला होता. त्यासाठी शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी संपूर्ण पुलावर आपापल्या पक्षाचे झेंडे लावत कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. परिणामी सामाजिक अंतराचे भान मात्र दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी पाळल्याचे दिसून येत नव्हते. त्यामुळे सामाजिक अंतराचा प्रशासनाच्या उपस्थितीतच फज्जा उडाल्याचे चित्र दिसून आले.

हा कार्यक्रम शासकीय असताना वडवली उड्डाणपुलाच्या ठिकाणी शिवसेना व भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रोटोकॉल न पाळता प्रमुख पाहुणे बसण्याच्या ठिकाणी आपल्या पक्षाचे झेंडे लावल्याचे दिसून येत होते. तर प्रशासकीय अधिकारी आडबाजूला उभे राहिल्याचे दिसून आले. थोडक्यात हा कार्यक्रम भाजपा व शिवसेनेने हायजॅक केल्याचे दिसून आले. वडवली उड्डाणपुलावरून फेरफटका मारल्यानंतर नगरविकासमंत्री शिंदे हे कल्याणकडे रवाना झाले. तेथे त्यांच्या हस्ते वालधुनी पुलावरील दुसऱ्या मार्गीकेचे उद्घाटन करण्यात आले.