‘मिस टिन वर्ल्ड’ सुश्मिता सिंगचा कल्याणमध्ये भव्य नागरी सत्कार संपन्न

‘मिस टिन वर्ल्ड’ सुश्मिता सिंगचा कल्याणमध्ये भव्य नागरी सत्कार संपन्न

कल्याण (प्रतिनिधी) : 
कल्याणच्या सुश्मिता सिंगने आपल्या पहिल्याच प्रयत्नात थेट जागतिक सौंदर्य स्पर्धेच्या किताबावर नुकतेच आपले नाव कोरले. या देदीप्यमान यशाबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते नुकताच भव्य नागरी सत्कार करण्यात आला. कल्याण स्पोर्टस क्लब येथे हा सोहोळा पार पडला.

काही दिवसांपूर्वी लॅटिन अमेरिकेत (एल सालवाडोर) झालेल्या 'मिस टिन वर्ल्ड २०१९' (मुंडीयाल) ही जागतिक सौंदर्य स्पर्धा झाली. त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुश्मिताने आपल्या बुद्धीचातुर्य आणि सादरीकरणाच्या जोरावर विजेतेपदावर आपले नाव कोरले. सुश्मिताच्या या यशाने ती राहत असणाऱ्या कल्याण शहरातील लोकांचा आनंद गगनात मावत नव्हता. तिच्या यशाबद्दल तिचे कौतुक करण्यासाठी कल्याण शहरवासियांतर्फे तिचा भव्य नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 'मिस टिन वर्ल्ड' स्पर्धा आयोजित करणाऱ्या संघटनेचे संचालक फ्रान्सिस्को कोरटेझ या सोहळ्यासाठी उपस्थित होते. कल्याण बिझनेस कम्युनिटीने या सत्कार सोहोळ्याच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता.

सोहोळ्यासाठी उपस्थित राज्यमंत्री रविंद्र चव्हाण, खा. डॉ. श्रीकांत शिंदे, महापौर विनिता राणे, आमदार नरेंद्र पवार, गणपत गायकवाड  आदींनी आपल्या भाषणात सुश्मिताचे भरभरून कौतुक केले. 'मिस टिन वर्ल्ड' नंतर सुश्मिताने आता 'मिस वर्ल्ड'चा किताबही मिळवावा अशी अपेक्षा व्यक्त करत तिला मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. सुश्मिताचा भव्य नागरी सत्काराचा कौतूक सोहळा पाहून सुश्मिताच्या आई सत्यभामा, वडिल नविन सिंग यांचे डोळे आनंदाश्रुंनी भरून आले. या नागरी सत्कार सोहळ्याला उत्तर देताना सुश्मिताने आई-वडिलांनी दाखवलेला विश्वास आणि या क्षेत्रातील आपले गुरु मेलवीन नरोन्हा यांनी केलेले अमूल्य मार्गदर्शनामुळेच आपण हे शिखर गाठू शकलो असे नमूद केले. या भव्य सोहळ्याला शहरातील मान्यवरांसह कल्याणकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.