आ. चव्हाण यांचे शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी - राजेश मोरे 

आ. चव्हाण यांचे शिवसेना नेत्यांवरील आरोप केवळ प्रसिद्धीसाठी - राजेश मोरे 

डोंबिवली (प्रतिनिधी) : डोंबिवली मतदारसंघाचे भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांच्याकडून पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर केले जाणारे आरोप हे केवळ प्रसिद्धीसाठी करण्यात येत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने भाजपवर पलटवार केला आहे. गेल्या काही दिवसांपासून डोंबिवली शहरातील राजकारण चांगलेच तापले आहे. आमदार चव्हाण यांनी विविध मुद्द्यांवरून मंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांच्यावर टिका केली जात आहे. आता शिवसेनेनेही आपले मौन सोडत भाजपा आणि आमदारांवर कठोर शब्दात टिका केली. शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत आमदार चव्हाण यांनी केलेले आरोप फेटाळून लावले. 

चव्हाण हे गेल्या ११ वर्षांपासून डोंबिवलीत आमदार आहेत. मात्र या कार्यकाळात त्यांनी डोंबिवलीसाठी केलेले एक तरी विधायक काम दाखवून द्या. त्यांच्याच पक्षाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांनी डोंबिवलीला सर्वात घाणेरडे शहर असे का म्हटले? कोवीड आल्यापासून गेल्या २ वर्षांत आमदार चव्हाण यांनी काय काम केले? यासारखे विविध प्रश्न उपस्थित करत राजेश मोरे यांनी आमदार चव्हाणांवर निशाणा साधला. खा. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात केलेल्या विकासकामांची यादी वाचण्यासाठी वेळ कमी पडेल. आपल्यानंतर राजकारणात आलेल्या आणि खासदार झालेल्या खासदार शिंदे यांना लोकांचा मिळणारा पाठींबा पाहून त्यावरील आकसापोटी चव्हाण यांच्याकडून असले आरोप होत असल्याचे राजेश मोरे यांनी म्हटले आहे. 

पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ झाल्याने नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. त्यासाठीही आमदार चव्हाण यांनी कधी तरी बॅनरबाजी करावी, असा टोला राजेश कदम यांनी यावेळी लगावला. कचरा शुल्क लागू केल्याच्या मुद्यावर बोलताना आमदार चव्हाण यांनी दिशाभूल करणारी माहिती दिल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.