ठाण्यातील शाळांमध्ये वॉटर बेल'ची अंमलबजावणी करण्याची मनसेची मागणी 

ठाण्यातील शाळांमध्ये वॉटर बेल'ची अंमलबजावणी करण्याची मनसेची मागणी 

ठाणे (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार ठाणे शहरातील सर्व शाळांमध्ये वॉटर बेल उपक्रमाची (पाणी पिण्याची सूचना) अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे उपशहर अध्यक्ष प्रमोद पत्ताडे यांनी ठाणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी व ठाणे महापालिकेचे उपआयुक्त (शिक्षण) यांना लेखी निवेदन देऊन केली आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार वॉटर बेल हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत शालेय कालावधीत पाणी पिण्यासाठी तिन वेळा बेल वाजवणे आवश्यक आहे. या बेल नुसार काही मिनिट मुलांना पाणी पिण्यासाठी द्यावा अशी सूचना शासनाने केली आहे. मात्र संपूर्ण ठाणे शहरात वॉटर बेल उपक्रमाची (पाणी पिण्याची सूचना) अंमलबजावणी होत नसून विद्यार्थ्यांच्या शारीरिक आरोग्यासंबंधी महत्त्वाच्या अशा उपक्रमाविषयी शाळा टाळाटाळ करत असाव्यात असे निदर्शनास येत असल्याचे या निवेदनात नमूद करून ठाणे शहरातील अनुदानित व विनाअनुदानित अशा सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी सदर उपक्रम लवकरात लवकर राबवावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. 

यावेळी मनविसेचे शहर अध्यक्ष किरण पाटील, ठाणे शहर सचिव सचिन सरोदे, ठाणे उपशहर अध्यक्ष संदिप चव्हाण, उपशहर अध्यक्ष दीपक जाधव, विभाग अध्यक्ष हेमंत मोरे व ऋषिकेश चौधरी, उपविभाग अध्यक्ष हर्षद कांडोळे, विशाल पाटील आणि उपशाखा अध्यक्ष हेमंत गायकवाड उपस्थित होते.