मनसेने केला ‘या’ खऱ्याखुऱ्या कोरोना योद्धयाचा सन्मान

मनसेने केला ‘या’ खऱ्याखुऱ्या कोरोना योद्धयाचा सन्मान

ठाणे (प्रतिनिधी) : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे अनेक लोक आपण पाहिले. पण या रोगामुळे ज्या लोकांचा मृत्यू होतो अशा लोकांवर कोण अंत्यसंस्कार करतं हा प्रश्न आपल्याला कधी पडलाय का? फ्रंटलाईन वॉरियर म्हणून समाजातल्या विविध घटकांचं कौतुक होतंय, व्हायलाच हवं. त्याचवेळी आपल्या जीवाची पर्वा न करता कोव्हिडने दगावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करणाऱ्या रुपेश भोईर याचा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.

ठाण्यातील बाळकूम येथे राहणारे रुपेश भोईर यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता  गेल्या पाच महिन्यांपासून कोव्हिडने दगावलेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्याचं काम अव्याहतपणे करत आहेत. या खऱ्याखुऱ्या कोरोना योध्दाचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे -पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष अरुण अरुण घोसाळकर यांच्या टीमने रुपेश भोईर या कोरोना योध्याचा मोक्षाचे आणि मुक्तीचे प्रतीक असणाऱ्या भगवान महादेवांची मूर्ती देऊन सत्कार केला.

यावेळी काजल डावखरे, निलम भोईर, प्रितेश मोरे, ओमकार महाडिक, सागर कदम, सुरज कदम, भूषण जाधव, विशाल पाटील, आकाश पवार, विरेश मयेकर, नितेश जाधव, अजिंक्य जोशी, भावेश नवले, तन्मय कोळी, ऋषीकेश चौधरी, विनायक बिटला, प्रणिल वाघमारे, हरेश शेळके, विशाल साळुंखे, विरेंद्र पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

रुपेश भोईर हे कोरोनापूर्व काळातही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याचं काम करायचे. जेव्हा कोव्हिडचा प्रादुर्भाव सुरू झाला तेव्हा मृतदेहांची विल्हेवाट कशी लावायची हा प्रश्नसमोर निर्माण झाला तेव्हा रुपेश भोईर यांनी ही जबाबदारी स्वीकारत सुमारे ६०० रुग्णांवर अंत्यसंस्कार केले आहेत.