वडवली उड्डाणपुलाचे मनसेने केले लोकार्पण; मात्र अर्ध्या तासात प्रशासनाने पूल केला बंद!

वडवली उड्डाणपुलाचे मनसेने केले लोकार्पण; मात्र अर्ध्या तासात प्रशासनाने पूल केला बंद!

कल्याण (प्रतिनिधी) : मोहने येथील वडवली व वालधुनी पुलाचे होणारे उद्घाटन सोमवारी लांबणीवर पडल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील शेकडो कार्यकर्त्यांसह येवून वडवली पुलाचे फीत कापून लोकार्पण केले. याचवेळी वालधुनी पुलाचे उद्घाटन पोलिसांनी आडवी व्हॅन लावून विरोध दर्शविल्याने या पुल मनसेला लोकार्पण करता आले नाही.

सोमवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे दोन्ही पुलांचे लोकार्पण राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचे निश्चित केले होते.मात्र सेनेचे खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याने महापालिका प्रशासनाने हा लोकार्पानाचा सोहोळाच रद्द केला. हे समजताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सचिव तथा आमदार राजू पाटील यांनी दुपारी शेकडो कार्यकर्त्यांसह वडवली उड्डाणपुलावर धडक देत पुलावरील पत्र्यांचे अडथळे दूर करीत फीत कापून उड्डाणपुलाचे लोकार्पण करण्यात आल्याचे जाहीर केले. यावेळी प्रशासनाच्या व राज्यकर्त्यांचा निषेध करण्यात आला. 

अडीच वर्षात बांधण्यात यावयाचा हा उड्डाणपूल महापालिका प्रशासनाने पूर्ण करण्यास अकरा वर्षे लावली. त्यातही आता मंत्र्यांना पुलाचे उद्घाटन करण्यास वेळ नसल्याने आम्ही हा पूल जनतेसाठी खुला केल्याची प्रतिक्रिया आ. राजू पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली. यावेळी आ. पाटील यांच्यासह उल्हास भोईर, काका मांडले, माजी नगरसेविका सुनंदा कोट, कस्तुरी देसाई, राहुल कोट, गणेश नाईक इत्यादीसह शेकडो कार्यकर्ते येथे उपस्थित होते. 

वालधुनी नाल्यावरील पुलाच्या मार्गिकेच्या उद्घाटन बारगळले

दरम्यान, मुरबाड रोडमधील वालधुनी नाल्यावर बांधण्यात आलेल्या पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेच्या उद्घाटनाला पोलिसांनी मनसेला विरोध दर्शविला. या मार्गिकेच्या तोंडाशी पोलीस व्हॅन आडवी लावल्याने त्याचे उद्घाटन करणे मनसे पदाधिकाऱ्यांना शक्य झाले नाही.

उद्घाटनानंतर वडवली पूल वाहतुकीसाठी बंद केला!

मनसेने वडवली पुलाचे औपचारिकरित्या उद्घाटन केले, मात्र त्यानंतर अर्ध्या तासातच वडवली पुल वाहतुकीकरिता पोलिस बंदोबस्तात बंद करण्यात आला. पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने येथील वाहनचालक व नागरिकांमध्ये समाधान पसरले होते. मात्र उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद केला गेल्याने येथील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. वाहतूकीसाठी सुरू करण्यात आलेला पुल पोलिसांनी नेमके कोणाच्या आदेशाने बंद केला, याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क व्यक्त करण्यात येऊ लागले.