कल्याण-डोंबिवलीतील समस्यांच्या सोडवणुकीसाठी मनसे आमदार महापालिकेत

कल्याण-डोंबिवलीतील समस्यांच्या सोडवणुकीसाठी मनसे आमदार महापालिकेत

कल्याण (प्रतिनिधी) :
कल्याणमधून निवडून आलेले मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी लगेच कामाला लागत कल्याण-डोंबिवलीतील समस्यांच्या सोडवणुकीसाठी आज महापालिका आयुक्त गोविंद बोडके यांची भेट घेतली. शहरातील पत्रीपुलाच्या निर्माणाचे काम, वाहतूक कोंडी, २७ गावांचा पाणीपुरवठा समस्या, कचरासफाईची समस्या अशा मुख्य समस्यांसह इतर विषयांचा यावेळी त्यांनी आढावा घेतला व त्यांच्या सोडवणुकीबाबत आयुक्तांशी चर्चा केली.

आ. पाटील यांच्या आयुक्त भेटीबाबत मनसेचे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर यांनी महापालिका प्रशासनाला पत्र दिले होते. त्यानुसार राजू पाटील यांनी आज सकाळी आयुक्त बोडके यांची त्यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी त्यांचे समवेत भोईर, गटनेते मंदार हळबे, यांच्यासह मनसेचे नगरसेवक, कल्याण आणि डोंबिवलीतील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी रस्त्यांची दुरवस्था, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, बीएसयूपी योजना या विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.

महापलिका आयुक्तांच्या भेटीनंतर राजू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना आ. पाटील यांनी नागरी समस्यां सोडविण्यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहू असे सांगितले. महापालिका क्षेत्रातील २७ गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या अमृत योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाईबाबत माहिती देताना सदर कामांच्या निविदा चार-चार वेळा काढल्या गेल्याचे सांगितले. बीएसयूपी योजने विषयी केलेल्या प्रश्नांवर आ. पाटील यांनी सदर मुद्दाही लावून धरू, असे स्पष्ट केला.