ठाण्यात महिलांच्या मोफत कर्करोग तपासणीसाठी 'मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन'

ठाण्यात महिलांच्या मोफत कर्करोग तपासणीसाठी 'मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन'

ठाणे (प्रतिनिधी): 
बदलत्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या स्तनाचे व गर्भाशयाच्या कर्करोगाचे वाढते प्रमाण कमी करून प्राथमिक स्तरावील कर्करोगाचे निदान करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक मोबाईल मॅमोग्राफी व्हॅनचे लोकार्पण महापौर मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांच्या हस्ते व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या उपस्थितीत झाले.

सदर समारंभाला सभागृह नेते नरेश म्हस्के, भाजपा गटनेते नारायण पवार, शिवसेना गटनेते दिलीप बारटक्के, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती सभापती नम्रता घरत, शिक्षण समिती सभापती विकास रेपाळे, नगसेविका परिषा सरनाईक, नगरसेवक मिलिंद पाटणकर, अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर, उपायुक्त संदीप माळवी, उपायुक्त अशोक बुरपल्ले, नगर अभियंता रवींद्र खडताळे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर.टी. केंद्रे आदी उपस्थित होते.

जीवनशैलीत होणारे बदल, उशिरा मूल होणे, स्तनपानाचा अभाव, स्तनाच्या कॅन्सरच्या प्राथमिक लक्षणांबाबत अपुरी माहिती वैद्यकीय चाचण्यांबाबतच्या जागृतीचा अभाव तसेच तपासणीसाठी आवश्यक सोयीसुविधांची अनुउपलब्धता यामुळे शहरातील महिलांना कर्करोगाची योग्य तपासणी करणे शक्य नव्हते. या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेच्यावतीने महिलांना कर्करोगाची तपासणी तात्काळ करून योग्य उपचार घेण्यात यावा म्हणून मोबाईल मॅमोग्राफी व्हॅन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नियमित तपासणी, जागरूकता, योग्य उपचार असतील तर गर्भाशयाच्या कर्करोगामुळे होणारे मृत्यू आपण टाळू शकते म्हणून महापालिकेच्या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये या मोबाईल व्हॅनद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. या व्हॅनची व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येणार असून संपूर्ण तपासणी मोफत असणाऱ्या या तपासणीचा प्रत्येक सोसायटीमधील महिलांना याच लाभ घेता येणार आहे. या तपासणी नंतर महिलांना तपासणीतील निष्कर्ष मोबाईल एसएमएस तसेच व्हाटसपवर पाठवली जाणार आहे. या तपासणी दरम्यान कर्करोगग्रस्त महिलांवर प्राथमिक उपचार महापालिकेच्या शिवाजी हॉस्पिटलला करण्यात येणार आहे. तसेच मोठ्या स्तरावरील कर्करोगाच्या उपचारासाठी टाटा हॉस्पीटल येथे पाठवण्यात येणार आहे.