आदिवासींना ३३ लाख एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर

आदिवासींना ३३ लाख एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर

मुंबई (प्रतिनिधी) : 
वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी यांना ३३  लाख २८ हजार ९० एकरहून अधिक वनक्षेत्र मंजूर करण्यात आले असल्याची माहिती, आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली आहे.

वन हक्क कायद्यानुसार अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना वैयक्तिक व सामूहिक वनहक्क मिळवण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. या कायद्यानुसार २०१९ अखेरपर्यंत अंतिमरित्या १ लाख ९० हजार ७३७ इतके वैयक्तिक व सामूहिक वन हक्क दावे मान्य करण्यात आले. प्रलंबित असलेले वन हक्क दावे व अपिले यांचा निपटारा करण्याच्या अनुषंगाने विभागामार्फत विशेष "वनमित्र मोहीम" राबवण्यात आली. यामुळे जमिनीचे हक्क मिळविण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे.

सामूहिक वनहक्क प्राप्त झालेल्या ७ हजार ७५६ गावांपैकी ३५६ गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे स्वयंसेवी संस्थांमार्फत तयार करण्यात येत आहेत. उर्वरित गावांचे संवर्धन व व्यवस्थापन आराखडे तयार करण्यासाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे व मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था, मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने "सामूहिक वनहक्क व्यवस्थापन पदविका" अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे.