बदली प्रस्तावांचे आदेश न काढल्यास महावितरणविरोधात आंदोलन

बदली प्रस्तावांचे आदेश न काढल्यास महावितरणविरोधात आंदोलन

कल्याण (प्रतिनिधी) :

महावितरणच्या अन्य कार्यालयांतील कर्मचारी-अधिकारी आणि अभियंत्यांच्या बदलीचे आदेश निघाले असताना कल्याण परिमंडळात अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. येत्या आठवड्यात हे आदेश पारित न केल्यास कल्याण परिमंडळाच्या तेजश्री कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्याचा इशारा वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता कृती समितीने दिला आहे.

बदली आदेशाच्या मागणीबाबत कृती समितीने कल्याण परिमंडळाच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवले असून त्यात हा इशारा देण्यात आला आहे. कल्याण परिमंडळ अंतर्गत अभियंता आणि कर्मचाऱ्यांचे बदली प्रस्ताव आद्यपही प्रलंबित आहेत. यासंदर्भात प्रत्येक संघटनेने वेळोवेळी भेटून पाठपुरावा केला असतानाही त्याबाबत संभ्रम कायम आहे. राज्यातील इतर सर्व परिमंडळात बदलीचे आदेश पारित करण्यात आले असताना कल्याण परिमंडळ प्रशासनाने कर्मचारी-अभियंत्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवत अन्याय केल्याचे कृती समितीचे म्हणणे आहे. तसेच मुख्य कार्यालयाने पारित केलेल्या परिपत्रक ५१४ चे उल्लंघनही कल्याण परिमंडळ प्रशासन करीत असल्याने कर्मचारी-अधिकारी, अभियंत्यांमध्ये असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही कल्याण परिमंडळ प्रशासनाकडून त्यावर कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नाईलाजस्तव येत्या २० ऑगस्टला कृती समितीतर्फे कल्याणातील तेजश्री कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कृती समितीतर्फे सांगण्यात आले आहे.

दरम्यान, कल्याण परिमंडळात गेल्या दोन आठवड्यात लागोपाठ दोन वेळा पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामूळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. रखडलेल्या बदल्यांमुळे अनेक ठिकाणी कर्मचारी, अधिकारी आणि अभियंत्यांची वानवा असून त्याचा नाहक त्रास महावितरणच्या ग्राहकांना होत असल्याचेही कृती समितीतर्फे स्पष्ट करण्यात आले. यासंदर्भात महावितरणच्या कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता रफीक शेख यांनी सांगितले की, महावितरण कल्याण परिमंडळातील बदल्यांबाबत वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्यांच्याकडून निर्णय झाल्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल.