कल्याण रिंगरूट प्रकल्पाची खासदारांनी केली पाहणी; गोवेलीपर्यंत जाणार रिंगरूट

कल्याण रिंगरूट प्रकल्पाची खासदारांनी केली पाहणी; गोवेलीपर्यंत जाणार रिंगरूट

कल्याण (प्रतिनिधी) : कल्याण-डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टिने महत्वाकांक्षी असलेला कल्याण रिंगरूट प्रकल्पाच्या कामाची शुक्रवारी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समवेत पाहणी केली. 

खा. शिंदे हे कल्याण-डोंबिवलीमधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. याचाच भाग म्हणून कल्याण रिंगरुट प्रकल्पाचे काम लवकरात लवकर सुरु होण्यासाठी ते २०१४ पासून राज्य शासन, एमएमआरडीए आणि महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहेत. शुक्रवारी त्यांनी रिंगरूट प्रकल्पाच्या कामाची प्रशासनासमवेत पाहणी दौरा केला. यावेळी त्यांचे सोबत एमएमआरडीए अधीक्षक अभियंता जयवंत ढाणे, महापौर विनिता राणे, शिवसेनेचे डोंबिवलीचे शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दिपेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, परिवहन सभापती राजेश कदम, एमएमआरडीएचे संबधित अधिकारी उपस्थित होते.

२० किमीच्या या प्रकल्पाच्या ७ टप्प्यांपैकी टप्पा क्र. ४ ते ७ दुर्गाडी – टिटवाळा हे एकूण १७ कि.मी. चे काम युद्धपातळीवर सुरु असून त्याचे ६०टक्के काम आज पूर्ण झाले आहे. याबद्दल खासदारांनी समाधान व्यक्त करत एमएमआरडीए प्रशासन, तसेच या प्रकल्पासाठी पाठपुरावा करणारे महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे विशेष कौतुक केले. टप्पा क्र.७ टिटवाळा नंतर पुढे गोवेलीपर्यंत हा २ किमी रस्ता वाढविण्यासाठी प्रस्ताव तयार करुन मंजूरीकरिता राज्य सरकारकडे पाठविण्याच्या सूचना यावेळी खासदार शिंदे यांनी प्रशासनाला केल्या. तर फेज -१ टप्पा क्र. ४ ते ७ चे काम मार्च अथवा एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण करणार असल्याचे यावेळी एमएमआरडीए प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. त्याचबरोबर रिंग रुट प्रकल्पाचा टप्पा क्र. ३ मोठागाव ते दुर्गाडी या कामाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल आणि त्याचे काम देखील लवकरात लवकर सुरु होईल, असे यावेळी महापालिका प्रशासनाने यावेळी सांगितले.

कल्याण, डोंबिवली शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टिने महत्वाकांक्षी असलेल्या या कल्याण रिंगरूट प्रकल्पासाठी २०१४ पासून खासदार शिंदे आग्रही राहून पाठपुरावा करत आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर सध्या १ तास लागत असलेले डोंबिवली ते टिटवाळा हे अंतर १५ मिनिटात जाता येणार आहे. पत्रीपूलानंतर आता काटई पूल, दुर्गाडी पूल, कल्याण रिंगरुट सोबतच कल्याण – शिळ रस्त्याचे रुंदीकरण असे अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून कल्याण व डोंबिवली तील वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरुपी निकाला काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आपणा सर्वांच्या आशिर्वादाने आणि सहकार्याने हे शक्य होताना दिसत असल्याची प्रतिक्रिया शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.