मुंबई- वडोदरा महामार्ग बाधितांना मोबदला देणार- डॉ. परिणय फुके

मुंबई- वडोदरा महामार्ग बाधितांना मोबदला देणार- डॉ. परिणय फुके

मुंबई (प्रतिनिधी) :
मुंबई- वडोदरा महामार्गातील मौजे बल्याणी ता. कल्याण येथील संपादित क्षेत्रापैकी एकूण २७ सर्वे नंबर्समध्ये चाळींचे बांधकाम करण्यात आले आहे. या चाळींचे मूल्यांकन करण्यात आले असून बाधित होणाऱ्या चाळीतील रहिवाशांना महसूल विभागामार्फत मोबदला देण्यात येईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी मंगळवारी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला दिली.

डॉ. फुके म्हणाले, या प्रकल्पासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी, कल्याण यांची नेमणूक करण्यात आल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, ठाणे यांनी कळविले आहे. बाधित होणाऱ्या रहिवाश्यांना मोबदला देण्यासाठी २८.२८ कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे. सदर विषयासंदर्भात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सदस्य जगन्नाथ शिंदे आदींनी प्रश्न उपस्थित केला.