टी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा सहभाग 

टी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोन संघाचा सहभाग 

कल्याण (प्रतिनिधी) : इंडिया टी-10 क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नोएडा (दिल्ली) येथे ३ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणाऱ्या टी-10 क्रिकेटच्या पूल बी स्पर्धेत मुंबई झोनचा संघ सहभागी होणार आहे. या संघात कल्याण शहरातील अष्टपैलू क्रिकेटपटू गॅब्रिएल प्रवीण जाधवची निवड झाली आहे.

क्रिकेटमधील टेस्ट मॅच, वन डे मॅच, टी-20 प्रमाणे टी-10 क्रिकेट लोकप्रिय होत आहेत. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय क्रिकेटमध्ये मर्यादित खेळाडूंना संधी मिळते. त्यामुळे अन्य अनेक गुणवान खेळाडूंना प्रतिभा असूनही संधी मिळत नाही. अशा गुणवान खेळाडूंना टी-10 क्रिकेटमध्ये संधी मिळून त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव मिळून त्यांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळू लागली आहे. या पार्श्वभूमीवर इंडिया टी-10 क्रिकेट असोसिएशनच्या वतीने नोएडा (दिल्ली) येथे आयोजित पूल बी गटातील टी-10 क्रिकेट स्पर्धेला ३ ऑगस्ट २०२१ पासून प्रारंभ होत आहे. यामध्ये मुंबई, राजस्थान, हरयाणा, बिहार, उत्तराखंड, बुंदेलखंड या राज्यांसह अनेक संघ सहभागी होणार आहेत. त्यात सहभागी होणाऱ्या मुंबई टी-10 संघाचे नेतृत्व कर्णधार झेनुल खान (अंधेरी) करणार आहे. संघातील उर्वरित खेळाडूंमध्ये कल्याणच्या गॅब्रिएल प्रवीण जाधव याच्यासह जयप्रकाश बोर्डे, रोहन सूरज डोंडे, दिव्यकृष्णा प्रशांत नागरे (यष्टीरक्षक), गौरव तानजी कोथुले, अनिकेत दत्तात्रय जाधव, गुलम नबी मोहम्मद घोसी, प्रतिक ज्ञानदेव पांडे, गणेश दिनकर जाधव, गौरव तुळशीदास शहाणे व प्रिन्स हिर्पारा हे मुंबई, ठाणे, नाशिकमधील गुणवान क्रिकेटपटू सहभागी होत आहेत.

कल्याणचा अष्टपैलू गॅब्रिएल

मुंबई टी-10 संघातील अष्टपैलू खेळाडू म्हणून गॅब्रिएल प्रवीण जाधव हा महत्वाची जबाबदारी सांभाळणार आहे. सहा फुट एक इंच अशी भारदस्त उंची असलेला गॅब्रिएल डावखुरा असून तो उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज आहे. तो प्रशिक्षक नजमूसोरी खोत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटचे धडे घेत आहे. गॅब्रिएलची मुंबई टी-10 संघात झालेली निवड कल्याणकरांना अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

मुंबई-ठाण्यातील प्रतिभावान खेळाडूंना संधी

मुंबई टी-10 असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण जाधव या स्पर्धेबाबत आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मुंबई आणि जवळपासच्या १०० कि.मी.च्या परिसरातील शहरी आणि ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंमध्ये लपलेल्या प्रतिभेला व्यक्त होण्यासाठी ही टी-10 स्पर्धा एक चांगली संधी आहे. या स्पर्धेमुळे मुंबई-ठाणे परिसरातील प्रतिभावान खेळाडूंना आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावर प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल.